खानापूर : येथील व्ही. वाय. चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज महाविद्यालयाच्या आवारात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोकमान्य संस्थेचे संस्थापक डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते झाडाचे रोप लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी लोकमान्य संस्थेचे संचालक दामोदर वागळे, किरण गावडे, महाविद्यालयाचे संयोजक डी. एन. मिसाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य शिरीष केरुर, बंडु मजुकर, सत्यव्रत नाईक, प्रकाश चव्हाण, अरुण बडीगेर उपस्थित होते. डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून खानापूर येथे तांत्रिक महाविद्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे.
तालुक्यात तांत्रिक महाविद्यालयाच्या कमतरतेमुळे खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना बेळगावसह इतर ठिकाणी जाऊन तांत्रिक शिक्षण घ्यावे लागत होते. यासाठी डॉ. किरण ठाकुर यांनी खानापूर ‘लोकमान्य भवन’ या ठिकाणी तांत्रिक महाविद्यालयाची सुरुवात केली आहे. या महाविद्यालयाच्या आवारात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी किरण ठाकुर यांनी तांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक वर्गाशी चर्चा करून तांत्रिक महाविद्यालयाच्या वाटचालीसंदर्भात आढावा घेतला आणि उच्च व दर्जेदार शिक्षणासाठी महाविद्यालयाची ख्याती सर्वदूर व्हावी, हाच हेतू ठेवून विद्यादान करावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी लोकमान्य संस्थेचे कर्मचारी आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.









