संयुक्त अरब अमिरातीच्या समूहातील एक देश अबुधाबी येथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीस्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. ही घटना असामान्य म्हणावी लागेल. या मंदिराला अबुधाबीच्या अमीरांनीच 27 एकरांचा भूखंड उपलब्ध करुन दिला होता. त्यावर या ‘नागर’ शैलीतील वास्तूरचना असलेल्या मंदिराचे निर्माणकार्य झाले. अबुधाबी किंवा संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, जेद्दाहृ शारजाह इत्यादी छोट्या देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. हे भारतीय (विशेषत: हिंदू) तेथे उच्च पदांवर काम करतात. विशेषत्वाने भारतातील तंत्रज्ञांना तेथे अधिक मागणी असते. अनेक भारतीय तेथे व्यवसायही करतात आणि अनेक व्यवसायांमध्ये त्यांनी उत्तम प्रगतीही केली आहे. अशा हिंदू भारतीयांसाठी एका भव्य मंदिराची निर्मिती झाल्याने त्यांच्या धार्मिक भावनांचा आदर राखला गेला आहे. या मंदिराला अबुधाबीच्या प्रशासनाने उत्कट साहाय्य केले तसेच भूखंडाची सुविधा प्राप्त करुन दिली, हे विशेष प्रशंसनीय आहे. वास्तविक, संयुक्त अरब अमिरातीतील देश हे मुस्लीम देश आहेत. तेथे शरियत कायदा चालतो. तेथे लोकशाही नसून राजघराण्यांच्या हाती सत्ता असते. अशा देशांमध्ये हिंदू मंदिराची निर्मिती होणे आणि या देशांमधील प्रशासन आणि जनता यांनी अशा मंदिराच्या निर्माणकार्याला अनुकूल परिस्थिती निर्माण करुन देणे या घटना वातावरणात परिवर्तन होत असल्याचे संकेत देतात. या मंदिराच्या निर्माणकार्यामुळे भारत आणि संयुक्त अरब अमिरात एकमेकांच्या अधिक जवळ आले आहेत, हे निश्चित. या मंदिरामुळे केवळ तेथे काम करणाऱ्या भारतीयांनाच आनंद झाला आहे असे नव्हे. तर भारतात आणि साऱ्या जगातीलच हिंदूंसाठी ही सन्मानाची आणि अभिमानाचीही घटना आहे. या मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले होते. यातून जगात भारताच्या वाढत्या प्रभावाचे प्रत्यंतर येत आहे. ‘या मंदिराचे निर्माणकार्य हे जागतिक बंधुत्व आणि धार्मिक सलोखा यांना वृद्धींगत करणारे आहे’ असे प्रशंसोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले असून ते अत्यंत समयोचित आहेत. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात पूर्वापारपासून निकटचे संबंध आहेत. भारत या देशांपैकी काहींकडून कच्च्या इंधन तेलाची आयात करतो. तसेच नैसर्गिक वायूचीही आयात केली जाते. हे देश भारताकडून तयार अन्नपदार्थ, फळे, भाज्या, रासायनिक पदार्थ, औषधे, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू, इत्यादींची आयात करतात. भारतातील नागरिकही या देशांमध्ये गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून काम करीत आहेत. हे देश समृद्ध असल्याने तेथे वेतन अधिक असते. त्यामुळे अमेरिका आणि युरोप किंवा अलीकडच्या काळात ऑस्ट्रेलिया यांच्या पाठोपाठ उच्चशिक्षित भारतीयांचा या देशांमध्ये कामासाठी जाण्याकडे ओढा असतो. या देशांमध्ये भारतीय कामगारांना किंवा कमी शिक्षण लागणारी कामे करणाऱ्यांनाही मोठी मागणी असते. अशा प्रकारे उच्चशिक्षित तंत्रज्ञ ते निम्नशिक्षित कामगार किंवा व्यावसायिक अशा दोन्ही गटांमधील कर्मचाऱ्यांना या देशांमध्ये मागणी आहे. ही मागणी 25 ते 30 वर्षांपूर्वी आतापेक्षाही जास्त होती. तथापि, नंतरच्या काळात पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात निम्नशिक्षत कर्मचाऱ्यांची भरती केली गेल्याने भारतीयांना मागणी कमी झाली होती. पण पाकिस्तानी कामगारांचा अनुभव चांगला न आल्याने पुन्हा भारतीयांना मागणी वाढू लागली आहे, असे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील देश परस्परांच्या आवश्यकता पुरविण्यासाठी एकमेकांना अनुकूल ठरत आहेत. या आर्थिक संबंधांना आता अबुधाबीतील मंदिराच्या निर्माणकार्यामुळे एक सांस्कृतिक आयामही मिळाला आहे. धर्म आणि अर्थ या दोन्हींचीही माणसाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका असते, असे अनेक तज्ञ म्हणतात. काहींच्या मते धर्म अनावश्यक असला तरी, सर्वसामान्य माणसांना धर्म आणि अर्थ या दोन्हींचे आकर्षण असतेच. जेव्हा एका परक्या देशात काम करणाऱ्यांच्या धर्मभावनांचा आदर तेथील स्थानिकांकडून राखला जातो, तेव्हा ती विशेष कौतुकाची बाब निश्चितच असते. अबुधाबीचे मंदिर हे संयुक्त अरब अमिरातीतील प्रथम हिंदू मंदिर असल्याचे सांगितले जात आहे. असे मंदिर तेथे व्हावे ही तेथील भारतीयांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. तथापि, ती मान्य होईल की नाही, याची शाश्वती नव्हती. तथापि, ती मान्य केली गेल्याने एक नवा आदरणीय पायंडा पाडला गेला आहे. नजीकच्या काळात या भूप्रदेशात आणखी मंदिरे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ याच भूभागात नव्हे, तर भारताबाहेर इतरही देशांमध्ये अशा भव्य मंदिरांचे निर्माणकार्य केले जात आहे. भारतीय नागरिक आता देशोदेशी कामांसाठी जात आहेत. काहीजण तेथे केवळ नोकरी किंवा व्यवसायांसाठी जातात. तर काहीजण तेथे कालांतराने स्थायिक होतात. पण ते आपला धर्म किंवा संस्कृती तेथेही जपतात. ती जपत असताना स्थानिक संस्कृतीशी जुळवून घेऊन त्या देशांच्या समृद्धीला आपले ज्ञान आणि कष्ट यांच्या माध्यमांमधून मोठा हातभार लावतात. त्यातून स्वत:चीही समृद्धी साधतात. परिणामी, भारतीय नागरिकांसंबंधी विदेशांमध्ये एकंदरित मत चांगले असल्याचे दिसून येते. त्यामुळे विविध देशांमधून आज भारतीयांना कामासाठी मागणी येत आहे. याचा लाभ भारताचे नागरिक उठवतील आणि आपला देश आणि आपला धर्म यांच्यासंबंधी जगातील अन्य देशांमध्ये अधिकाधिक आदरभाव निर्माण करण्याचे आपले कार्य असेच पुढे करत राहतील, हे निश्चित आहे.
Previous Articleटी-20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माकडे नेतृत्व
Next Article नेदरलँड्सचा भारतीय महिलांवर निसटता विजय
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








