‘कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान’ हा सांप्रतच्या काळातला जगभरातील सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. याच तंत्रज्ञानाच्या संदर्भात फ्रान्समध्ये नुकतीच एक शिखर परिषद झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे या परिषदेचे सहअध्यक्ष होते. वास्तविक भारतात ही परिषद पुढच्या वर्षी व्हायची आहे. त्या परिषदेचे अध्यक्षस्थान अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच असेल. तरीही फ्रान्सच्या अध्यक्षांनी आपल्या देशातील परिषदेचे सहअध्यक्षही भारताला देऊ पेले, हे भारताच्या दृष्टीने गौरवास्पद आहे. या परिषदेत देशोदेशींचे नेते, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्रातील जगद्विख्यात उद्योगपती आणि अनेक तंत्रज्ञांनी भाग घेतला होता. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचीही या परिषदेला विशेष उपस्थिती होती. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हा चर्चेचा विषय असला, तरी या तंत्रज्ञानासंबंधीची नेमकी माहिती निदान विकसनशील देशांमधील बहुतेक सर्वसामान्यांना नाही. भारतातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाकडे बहुतेक लोक साशंकता, चिंता, उत्सुकता अशा विविध भावनांच्या माध्यमांमधून पाहतात. या तंत्रज्ञानाविषयी अपसमजही प्रचंड प्रमाणात आहेत. त्यामुळे फ्रान्समध्ये झालेल्या या परिषदेत काय घडते, याकडे अनेकांची दृष्टी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात या भावनांचा उल्लेख करुन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचा मुद्दा असा की, कोणतेही नवे तंत्रज्ञान आले, की त्यासंबंधी प्रारंभीच्या काळात अनेक संशय आणि अपसमज सर्वसामान्यांच्या मनात असतात. कालांतराने ते दूर होतात. आज गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या हाती असणारा मोबाईल फोन असो किंवा त्याच्यापूर्वी आलेला संगणक किंवा काँप्युटर असो, या साऱ्यांसंबंधात अनेक कुशंका आणि संशय अनेकांच्या मनांमध्ये होताच. विशेषत: संगणक तर कोट्यावधी लोकांचे रोजगार काढून घेऊन त्यांना रस्त्यावर आणेल, अशा समजुती पसरविण्यात आल्या होत्या. भारतात हा ‘राक्षस’ येऊच देऊ नका, असाही आग्रह 80 च्या दशकात धरण्यात आला होता. तथापि, आज संगणकाचा उपयोग करता येणे हे केवळ प्रतिष्ठेचेच नव्हे, तर आवश्यक बनले आहे. संगणकामुळे बेकारी तर निर्माण झालेली नाहीच, उलट संगणक निर्मितीच्या तंत्रज्ञानात आपला देश मागे पडल्याने बेकारी वाढली आहे, असे म्हणता येते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या संदर्भातही असेच घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रात भारत मागे पडता कामा नये, ही दक्षता आतापासूनच घ्यावी लागणार आहे. फ्रान्समधील परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या मुद्द्याचा हाच अर्थ आहे. अर्थातच, कोणत्याही तंत्रज्ञानाचे काही धोके असतात, तसेच काही ‘साईड इफेक्टस्’ असतात. तसेच या तंत्रज्ञानाचेही आहेत. या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करण्यात आला तर, प्रचंड गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या तंत्रज्ञानावर कोणत्याही एका देशाचा, संस्थेचा किंवा व्यक्तीचा एकाधिकार राहणार नाही, अशी दक्षता घेणे क्रमप्राप्त आहे. यासंबंधीचे निकषही जागतिक पातळीवर संयुक्तरित्या निर्धारित करण्यात यावयास हवेत आणि प्रत्येक देशावर हे निकष पाळण्याचे बंधन असावयास हवे. आज अमेरिका आणि चीन हे दोन देश या तंत्रज्ञानात आघाडीवर आहेत आणि त्यांच्यात जणू या तंत्रज्ञानावरुन ‘युद्ध’ होत असल्याची स्थिती आहे. एकेकाळी राजकीयदृष्ट्या ज्याप्रमाणे जग अमेरिका आणि रशिया या दोन देशांमध्ये विभागले गेले होते, तसे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या संदर्भात ते अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये विभागले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथेच भारताला खरी संधी आहे. खरेतर अशी माहिती मिळते की, स्वदेशी संगणकाची निर्मितीही भारतात 1957 मध्येच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या संस्थेने यशस्वीरित्या करुन दाखविली होती. पण त्यानंतर सरकारी पातळीवर किंवा खासगी पातळीवरही सातत्याने त्याच्या पुढचे टप्पे गाठण्यात आले नाहीत. संगणकाला पुढच्या काळात इतके महत्त्व प्राप्त होईल, हे ओळखण्याइतकी क्षमता आपल्या त्यावेळच्या धोरणकर्त्यांनी आणि नेतृत्वाने दाखविली नाही. त्यामुळे आज आपण संगणकाच्या क्षेत्रात जवळपास पूर्णत: परावलंबी असून आपल्याला या क्षेत्रात मागे पडल्याची जबरदस्त आर्थिक आणि तंत्रवैज्ञानिक किंमत मोजावयास लागली आहे. तरीही 2000 नंतरच्या काळात संगणक भारतात चांगलाच स्थिरावला असून भारताने या क्षेत्रातले आपले टॅलेंट सिद्ध केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हा संगणकीय तंत्रज्ञानाचाच एक अतिविकसीत टप्पा आहे, असे म्हणता येते. या तंत्रज्ञानाला भविष्यकाळात कोणते आणि किती महत्त्व प्राप्त होणार आहे, याचीही पुरेशी कल्पना आता आलेली आहे. त्यामुळे निदान या क्षेत्रात तरी भारताने स्वत:ची क्षमता विकसीत करुन आपण मागे पडणार नाही, हे सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे. तशी दूरदृष्टी असणारे नेतृत्वही आज देशाकडे आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये भारत या क्षेत्रात काहीतरी भरीव करुन दाखवू शकतो, अशी आशा करता येते. पहा, चीनने कशी या क्षेत्रात अशी प्रगती करुन अमेरिकेलाही वाकुल्या दाखविण्याइतकी क्षमता प्राप्त केली, अशी नुसती स्तुतिसुमने उधळून किंवा आरत्या ओवाळून काम भागणार नाही. आपल्यालाही हातपाय हलवावे लागतीलच. पॅरिस येथील शिखर परिषदेत या तंत्रज्ञानाच्या संबंधातील अनेक महत्त्वाच्या बाबींचा उहापोह करण्यात आला. भारतानेही आपली या क्षेत्रातील क्षमता दर्शविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. भविष्यकाळाची पावले आपण ओळखली आहेत, हे भारताने या परिषदेत स्पष्ट केले. आता या दृष्टीला दिली जाणारी कृतीची जोड कैक पटींनी वाढविण्याची आवश्यकता आहे. वेळ थोडा आहे. आव्हाने मोठी आहेत. पण सुयोग्य दिशेने गतीमान प्रयत्न केल्यास यश निश्चितच शक्य आहे, हाच पॅरीस येथील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान परिषदेचा आपल्या सर्वांना संदेश आहे.
Previous Articleप्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे की वादळ?
Next Article चिंता ‘मनी’ सूत्रे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








