अनेक गावांमध्ये कीर्तन, महाआरती, जागरभजन कार्यक्रम : मनोरंजनात्मक दांडिया, संगीत खुर्चीसह विविध स्पर्धांचे आयोजन
वार्ताहर /किणये
शारदीय नवरात्रोत्सवनिमित्त तालुक्याच्या विविध गावातील मंदिरांमध्ये भक्तीचा जागर सुरू आहे. रविवारी घटस्थापना करून मंदिरामध्ये आध्यात्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. काही गावांमध्ये सार्वजनिक मंडळांच्यावतीने दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना रविवारी सायंकाळी करण्यात आली. या ठिकाणी रोज महाआरती व विविध कार्यक्रम सुरू आहेत. ग्रामीण भागात दसरा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे. ग्रामदैवत, लक्ष्मीमंदिर व इतर मंदिरांमध्ये रोज पहाटे काकड आरती, त्यानंतर नित्यपूजा, दिवसभर भजनादी कार्यक्रम व सायंकाळी हरीपाठ, प्रवचन, कीर्तन व जागरभजन असे कार्यक्रम सुरू आहेत. नऊ दिवस मंदिरामध्ये अखंड ज्योत तेवत ठेवण्यात येते. ही परंपरा बहुतांशी गावांमध्ये जपण्यात येत आहे. काही गावांमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू आहेत. सध्या प्राथमिक शाळांना दसऱ्याची सुटी असल्यामुळे विविध स्पर्धा व मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये बालचमूंची गर्दी वाढलेली आहे. लक्ष्मी गल्ली हलगा येथील शिवसेना शिवजयंती उत्सव युवक मंडळ व गणेश तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सायंकाळी दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. रविवारी दुपारी जल्लोषात मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विविध मान्यवर व मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या ठिकाणी रोज रात्री 8.30 वा. महाआरती करण्यात येत आहे. यावेळी गल्लीतील भाविकांची उपस्थित मोठ्या संख्येने असते.
मंडळाच्यावतीने महिलांसाठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याचबरोबर संगीत खुर्ची व इतर स्पर्धा घेण्यात येत आहेत. भजन व विविध अध्यात्माचे कार्यक्रम सुरू असल्याची माहिती मंडळाच्या आयोजकांनी दिली. मच्छे गावातील ब्रह्मलिंग मंदिरात दसरोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. रोज सकाळी पूजा, पहाटे काकड आरती, भजनाचे कार्यक्रम सुरू आहेत. देवस्थान पंच कमिटीच्या उपस्थितीत दसरोत्सवाचे कार्यक्रम सुरू आहे. हे देवस्थान पंचक्रोशीत जागृत असल्यामुळे दर्शनासाठी भक्तांची रोज गर्दी होत आहे. मंदिरात सुरू असलेल्या भजनात महिला व वारकरी तल्लीन होतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. बेळगुंदी येथील कलमेश्वर गल्ली येथे सार्वजनिक अंकुर नवरात्रौत्सव मंडळ व ग्रामस्थ यांच्यावतीने रविवारी दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यंदाचे हे 21 वे वर्ष असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदा जाधव हे होते. मूर्तीची प्रतिष्ठापना प्रसाद बोकडे व सूरज बेटगेरीकर, महेश पाटील, मेघनाथ सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दुर्गामाता मूर्तीचे पूजन नामदेव गुरव व अरुण गुरव यांनी केले. श्रीराम मूर्ती पूजन मारुती शिंदे व विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कल्लाप्पा ढोकोळकर, रामचंद्र पाटील, नागेंद्र गवंडी, किशोर पाटील आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. रोज रात्री 8 वा. या ठिकाणी महाआरती होत आहे. यावेळी गावातील नागरिकांची गर्दी होत आहे.
बेळगुंदीत उद्या कीर्तन
शुक्रवार दि. 20 रोजी रात्री 8.30 वाजता बाल कीर्तनकार माउली महाराज जाहुरकर यांचे कीर्तन निरुपण होणार आहे. या कीर्तन सोहळ्याला उपस्थित राहावे, असे मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.









