वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
हर हर महादेवचा जयघोष तसेच गावचे ग्रामदैवत श्री कलमेश्वर देवस्थानचा जयघोषात मंगळवारी कंग्राळी बुद्रुक येथे गुढीपाडव्यानिमित्त बैलगाड्यांची शोभायात्रा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात काढण्यात आली. यावेळी गावातील तरुण एकमेकांच्या अंगावर गुलालाची उधळण करत गुढीपाडव्याचा आनंद लुटत असल्याचे चित्र दिसून येत होते. मंगळवारी सकाळी नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांनी शेतामध्ये जाऊन आपल्या काळ्या आईची विधीवत नारळ वाढवून पूजा केली. यानंतर अनेक ग्रामस्थ आपल्या नवीन व्यवसाय किंवा नवीन वाहन खरेदी, सोने खरेदीबरोबर इतर कामांची सुरुवात केल्याचे दिसून येत होते. सायंकाळी 6 वाजता बैलगाड्यांच्या शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी परंपरेनुसार सर्वप्रथम हुद्दार घराणे, तम्मणा गावडे घराणे, निंगापा गावडे घराणे, देसाई घराणे आदी घराण्यांचे बैलगाडे शोभायात्रेमध्ये सामील झाल्याचे दिसून येत होते. यावेळी सर्वप्रथम हनुमान मंदिरजवळ हुद्दार घराण्याचा बैलगाड्याचे पूजन श्री कलमेश्वर देवस्थानचे पुजारी बसवराज पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर गाऱ्हाणे घालून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आले. श्री कलमेश्वर मंदिरकडे सर्व बैलगाडे आल्यावर श्री कलमेश्वर मंदिरभोवती तीन प्रदक्षिणा घालण्यात आली. यानंतर परत शोभायात्रेतील सर्व गाड्यांचे बसवराज पुजारींच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी श्री कलमेश्वर मंदिर आवारात गावामध्ये सुखशांती नांदत गाव समृद्ध बनू दे, अशी मागणी करत समस्त ग्रामस्थांसमवेत गाऱ्हाणे घालण्यात आल्यानंतर नारळ फोडणे, उकडलेल्या पाच धान्यांच्या घुगरी व अंबिल प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.
बाळांचे नामकरण-तुलाभार कार्यक्रम
गुढीपाडव्याचे औचित्य साधून गावातील अनेक सुवासिनींच्या लहान बाळांचे नामकरण तसेच गुळ, कलिंगड, केळी, नारळ, फळे लहान बाळांच्या वजनाइतकी एका पारड्यात बाळ तर दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाइतकी पाच प्रकारची फळे ठेवून तुलाभार कार्यक्रम पार पाडला. तत्पूर्वी देवस्थान पंचांसमवेत परंपरेनुसार हुद्दार घराण्याचे व रामभाऊ हुद्दार यांनी वर्षभरातील पंचांगाचे वाचन केले. यानंतर गूळ व कडुलिंब प्रसाद म्हणून सर्वांना वाटप करण्यात आला.









