वरेरकर नाट्या संघ-वाङ्मय चर्चा मंडळाच्यावतीने आयोजन
बेळगाव : वरेरकर नाट्या संघ, वाङ्मय चर्चा मंडळाच्यावतीने बालगंधर्व स्मृती दिनानिमित्त वरेरकर संघाच्या के. बी. कुलकर्णी कला दालनात नाट्यागीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकानंतर कलाकार प्रसाद पंडित यांच्या हस्ते बालगंधर्व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाङ्मय चर्चा मंडळाचे अध्यक्ष प्रा. अनिल पाटणेकर यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. मालवणचे अॅड. दिलीप ठाकुर, बंडोपंत कुलकर्णी, डॉ. अंजली जोशी, स्वरुपा इनामदार, रोहिणी गणपुले, प्रसाद पंडित यांच्या हस्ते कलाकारांना पुष्पगुच्छ देण्यात आले.
‘संगीत शाकुंतल’ नाटकाच्या नांदीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. आकाश पंडित यांनी ‘नाथ हा माझा’, ‘मधुवन वणवण फिरत करी, मम आत्मा गमला’, ‘शुरा मी वंदिले’ ही पदे सादर केली. सुलक्षणा मल्ल्या-देसाई यांनी ‘नरवर कृष्णासमान’, ‘वद जाऊ कुणाला शरण’, ‘जोहार मायबाप जोहार’, ‘अवघाची संसार’ ही पदे सादर केली. योगेश रामदास यांनी ‘रूप बली तो नर शार्दुल, परवशता पाश दैवे’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’ ही नाट्यागीते सादर केली. त्यांना अंगद देसाई यांनी तबल्यावर व रविंद्र माने यांनी संवादिनीवर साथ केली. माहितीपूर्ण असे निवेदन सुरेखा भावे यांनी केले. या कार्यक्रमात बंडोपंत कुलकर्णी यांनी योगेश रामदास यांना तानपुरा भेट दिला. रायबागचे गुरुवर्य कल्याणराव देशपांडे यांच्या हस्ते बंडोपंत कुलकर्णी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.









