वास्तव्यास नसलेल्या घरांचा शेजाऱ्यांना धोका
बेळगाव : ग्रामीण भागासह शहरामधील जुन्या जीर्ण झालेल्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक घरांमध्ये कोणीही वास्तव्यास नसल्याने सदर घरे शेजारी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत नुकतेच जिल्हा पंचायतीला निवेदन देण्यात आले आहे. जीर्ण झालेल्या घरांच्या भिंती कोसळून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. दोन आठवड्यांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घरांची पडझड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जीर्ण झालेल्या घरांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होण्याबरोबरच अनेक घरांमध्ये नागरिक वास्तव्यास नसल्यामुळेही घरांची पडझड होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये बहुतांश नागरिक अडचणीतील घरे सोडून इतरत्र नवीन घरे बांधून वास्तव्यास गेल्याने जुनी घरे ओस पडत आहेत. त्यामुळे जुन्या घरांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी अति पावसामुळे या धोकादायक घरांचा शेजारील नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. शहरामध्येही अशा घरांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
शहरातील अनेक ठिकाणी अशी घरे ओस पडलेली आहेत.त्यांची देखभाल होत नसल्याने शेजारी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना याचा धोका निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे रात्री, अपरात्री सदर घरे कोसळत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून वास्तव्य करावे लागत आहे. मूळ घर मालकांकडून याची दखल घेतली जात नसल्याने इतर नागरिकांच्या जीवाचा प्रश्न आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. याकडे अधिकारी लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे. तालुक्यातील नागरिकांकडून याबाबत जिल्हा पंचायतीला निवेदन देऊन सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. ग्राम पंचायतकडे याबाबत तक्रार करूनही दखल घेण्यात आली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. धोक्याची माहिती देऊनही उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मोठा अनर्थ घडल्यावरच ग्राम पंचायतीला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









