वादळी वाऱ्याने मालमत्तेचे नुकसान : नागरिकांना धोका, पावसाळ्यापूर्वी हटविणे आवश्यक
बेळगाव : शहर परिसरातील झाडे आणि धोकादायक झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी हटवाव्यात, अशी मागणी नागरिक आणि वाहनधारकांनी केली आहे. आयुर्मान संपलेल्या झाडांचा धोका टाळण्यासाठी वनखात्याने झाडे हटवा मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. मागील दोन दिवसांत झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडून खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. संभाव्य धोका ओळखून मनपा आणि वनखात्याने धोकादायक झाडे हटविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी वनखात्यामार्फत लाखो रोपांची लागवड केली जाते. मात्र आयुर्मान संपलेल्या धोकादायक झाडांचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पावसाळ्यादरम्यान अशी झाडे वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागली आहेत. शिवाय अशा झाडांमुळे खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. शिवाय नागरिकांच्या जीवालाही धोका आहे. यासाठी धोकादायक झाडांचा सर्व्हे करून अशी झाडे हटवणे आवश्यक आहे. पावसाळ्यात काही झाडे मुळापासून उन्मळून पडतात. यामुळे विद्युत खांब आणि विद्युत तारांचे नुकसान होते. तर काही ठिकाणी घराची कौले, पत्रे आणि इतर साहित्याचेही नुकसान होते. हे टाळण्यासाठी धोकादायक झाडे वेळेत हटविणे गरजेचे आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे झाडांची मुळे कमकुवत
शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांमुळे विविध ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. गटारी, रस्ते, पेव्हर्स, ड्रेनेज लाईन आदींसाठी खोदाई झाली आहे. यामुळे शेजारी असलेल्या झाडांची मुळे कमकुवत बनली आहेत. अशी झाडे पावसाळ्यात धोकादायक ठरू शकतात. झाडांची मुळेच कुरतडली गेली असल्याने झाडे धोकादायक स्थितीत आहेत. अशा झाडांकडे वनखात्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
अवजड वाहतुकीला फांद्या धोकादायक
शहरात झाडे आणि झाडांच्या फांद्या भररस्त्यात एका बाजूला कलंडली आहेत. परिणामी अवजड वाहतुकीला या फांद्या धोकादायक ठरत आहेत. शिवाय या फांद्याजवळूनच विद्युतभारीत तारादेखील गेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी होत आहे. खासगी मालमत्तेत धोकादायक झाडे असल्यास वनखात्याकडे रितसर अर्ज करणे आवश्यक आहे.
वळीव पावसाने झाडांची पडझड
मागील दोन दिवसामध्ये झालेल्या वादळी वळीव पावसाने शहर परिसरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. त्यामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी झाडे आणि फांद्या वेळेत हटविणे आवश्यक आहे.
झाडे पावसाळ्यापूर्वी हटवा
शहरातील धोकादायक झाडांचा सर्व्हे केला जातो. धोकादायक झाडे आणि फांद्या हटविण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांचे सहकार्यही आवश्यक आहे. अशी झाडे पावसाळ्यापूर्वी हटविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. धोकादायक झाडांची मनपानेही कल्पना देणे आवश्यक आहे.
– शिवरुद्राप्पा कबाडगी (एसीएफ बेळगाव)









