गोकाक येथील व्यावसायिक राजेश झंवर खूनप्रकरण : नागरिकांतून उलट-सुलट चर्चा सुरू
वार्ताहर /घटप्रभा
गोकाक येथील व्यावसायिक राजेश झंवर यांच्या अपहरण व खूनप्रकरणी घटप्रभा नदीच्या उजव्या पाटबंधारे कालव्यात मृतदेहाचे शोधकार्य सुरू असून मंगळवारी चौथ्या दिवशी सायंकाळपर्यंत पोलिसांना मृतदेह सापडला नाही. यामुळे गोकाक नगरात उलट-सुलट चर्चा सुरू होत आहे. गोकाक येथील एक मित्र डॉ. सचिन शिरगावी याने मित्र राजेश झंवरकडून कोट्यावधी रुपये कर्ज घेऊन पैशांच्या वसुली वादविवादातूनच राजेश झंवरचे अपहरण करून खून करून मृतदेह कोळवी गावाजवळ घटप्रभा नदीच्या उजव्या कालव्यात टाकल्याची माहिती पोलिसांत दिली. यामुळे घटनास्थळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी भेट देऊन दोन डीवायएसपींच्या विशेष पोलीस पथकाकडून मृतदेह तपास कार्य सुरू करण्यात आले असून कालव्यातील पाणी उपसा करून गत चार दिवसांपासून कालवा परिसराच्या झाडी-झुडपे, ख•dयात शोधकार्य करीत असून मंगळवारी सायंकाळपर्यंत मृतदेह सापडला नाही. या प्रकरणातील प्रमुख आरोपी डॉ. सचिन शिरगावीसह दोघांना अटक केली असून तीन आरोपी फरारी असल्यामुळे पोलीस पथक त्या तिघांचा शोध घेत आहेत.
विविध प्रकारचे संशय?
आरोपी डॉ. सचिन शिरगावी याने राजेशच्या खुनासाठी गुंडांना सुपारी देऊन मृतदेह कालव्यात टाकला असता तर तीन दिवसांनी तरंगत दिसला असता. मात्र चार दिवस झाले तरी मृतदेहाचा थांगपत्त नसल्यामुळे खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने राजेश झंवर यांचा मृतदेहाचे तुकडे तर करून टाकले असावे, असा संशयही नागरिकांतून व्यक्त होत आहे. कालवा मोठा असल्यामुळे मृतदेह बेळगाव जिल्ह्याच्या सीमेबाहेर बागलकोट जिल्ह्यात गेला असावा असाही संशय व्यक्त होत आहे. याविषयी बागलकोट जिल्हा पोलीसही मृतदेहाचा शोध घेत आहेत.
आरोपीना न्यायालयात हजर, 14 दिवस रिमांड
व्यावसायिक राजेश झंवर अपहरण व खूनप्रकरणी मित्र डॉ. सचिन शंकर शिरगावी व त्याच्या दवाखान्यातीलच आरोपी डॉ. शिवानंद काडगौडा पाटील या दोघांना गोकाकचे सीपीआय प्रकाश यतनूर आणि उपनिरीक्षक एम. डी. घोरी यांनी कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. शहर न्यायाधीशांनी अधिक तपासासाठी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा दिली आहे.
तिघा शस्त्र तस्करांना अटक

कोल्हापूर : कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिघा शस्त्र तस्करांना अटक केली. रोहीतराज लक्ष्मण भोसले (वय 25 रा. नागाळा पार्क), अरबाज सिकंदर मुल्ला (वय 25, रा. आंबेवडी ता. करवीर), शफात ईर्शादअहमद तरासगर (वय 24, रा. गोकाक, जि. बेळगाव) या तिघांना अटक केली. दरम्यान, शफात तरासगर याने गोकाक येथील उद्योजकाचा सुपारी घेवून खून केल्याचेही तपासात उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. गोकाक येथील उद्योजक राजेश ऊर्फ मुन्ना सत्यनारायण झंवर (वय 53) हे शुक्रवारपासून बेपत्ता होते. आर्थिक व्यवहारातून अपहरण करून त्यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली. गोकाक येथील सिटी हेल्थ केअरचे डॉ. सचिन शिरगावी यांनी सुपारी देऊन हा खून केल्याची माहिती तपासात समोर आली. दरम्यान कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणने पिस्तूल तस्कर रोहीतराज व अरबाज या दोघांना जेरबंद केले. या दोघांनी एक पिस्तूल गोकाक येथील शफातला विकल्याची माहिती समोर आली.









