प्रतिनिधी /मडगाव
एका बाजूने गोव्यात गावोगांवी नरकासूरचा उदो-उदो केला जात असतानाच मडगावात नवयुवक हौशी मंडळा तर्फे गेली जवळपास 50 वर्षे दिवाळीच्या पूर्व संध्येला श्रीकृष्ण पूजा केली जाते. काल रविवारी सायंकाळी मडगावच्या श्रीहरि मंदिरात ही पूजा योगीराज दिगंबर कामत यांनी केली. नंतर श्रीकृष्णाची मूर्ती पालखीत विराजमान होऊन मडगाव शहरात बँड पथकासहीत मिरवणूक काढण्यात आली.
श्रीकृष्णाने नरकासूरचा वध केला. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा क्षण, म्हणूनच दिवाळी साजरी केली जाते. मडगावात साजरी होणाऱया श्रीकृष्ण पूजेतूनच हाच संदेश गेली कित्येक वर्षे दिला जात आहे. पुरोहिताच्या उपस्थितीत श्रीकृष्णांची विधीवत पूजा करण्यात आली. नंतर आरती व तीर्थ-प्रसादाचा कार्यक्रम झाला.
या पूजेला मडगावचे आमदार दिगंबर कामत, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, भाजपचे सरचिटणीस दामू नाईक, श्री हरि मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुहास कामत, देवस्थानचे सचिव मनोहर बोरकर, नवयुवक हौशी मंडळाचे अध्यक्ष सुबोध गोवेकर, खजिनदार सूजय लोटलीकर, सौ. आशा दिगंबर कामत, नगरसेविका श्वेता लोटलीकर, नगरसेवक श्री. वरक, चंदन नायक तसेच भाविक उपस्थितीत होते.









