वार्ताहर/ उसगांव
उसगांव येथील शिवसंस्कृती प्रतिष्ठान आणि उसगांव-गांजे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला ‘दीपजल्लोष उसगांव 2022’ हा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला येथील आदीनाथ सभामंडपात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उसगांव जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, सरपंच नरेंद्र गावकर, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंचसदस्य संजय गावडे, राजेंद्र नाईक, विनोद मास्कारेन्हास, गोविंद परब फात्रेकर, रेश्मा मटकर, प्रतिष्ठनचे अध्यक्ष नरेश नाईक, खजिनदार सागर केळुस्कर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री विश्वजीत राणे म्हणाले, उसगांव भागाचा नियोजनबद्ध विकास आपल्याला अपेक्षीत असून केवळ भौतिक विकासच नव्हे तर येथील नागरिकांचाही उत्कर्षावर भर दिला जाईल. शिवसंस्कृती प्रतिष्ठानने दिवाळी सणानिमित्त एक वेगळी संकल्पना राबवून संस्कृतीशी निगडीत भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी कौतूक केले. उसगावच्या विकासासाठी सर्वांनी एकसंघ राहून सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
श्रीकृष्णाच्या भव्य मूर्तीचे पूजन करुन व दीपप्रज्ज्वलीत करुन मंत्री विश्वजीत राणे यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी 10 वर्षांखालील मुलांसाठी राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यात राधेच्या वेशभूषेसाठी प्रथम आध्या आर्सेकर, द्वितीय सान्वी सागर नाईक, तृतीय अधिक्षा आदित्य मांद्रेकर तर उत्तेजनार्थ श्रवी घाडी, श्रीजा सतरकर व सौम्या अनुप नाईक यांना पारितोषिके मिळाली. श्रीकृष्णाच्या वेशभूषेसाठी प्रथम अंगद गाड, द्वितीय दीप सावंत, तृतीय आयुष तिळवे, उत्तेजनार्थ विहान अरुण शेट, रिदीत गावडे व शौर्य गावकर यांना पारितोषिके प्राप्त झाली. दोन्ही गटातील विजेत्यांना अनुक्रमे रु. 2000, रु. 1500, रु. 1000 अशी प्रथम क्रमांकाची तीन व रु. 500 ची तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
वैविद्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
शिवसंस्कृती प्रतिष्ठानच्या पालवाडा-उसगांव येथील भजन पथकाने सादर केलेल्या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनतर धावशीरे येथील ओम सत्यम सांस्कृतिक कला संघातर्फे समई नृत्य, गांजे येथील गांजेश्वरी कला व सांस्कृतिक संघातर्फे घुमट आरत्या, उसगांव आदिनाथ फुगडी पथकातर्फे फुगडी, कसयले येथील एकता महिला संस्थेतर्फे दांडिया, तिराळ येथील भूमिका सांस्कृतिक कला मंडळातर्फे गोफ, पालवाडा येथील गुरुदेव कला मंडळातर्फे देखणी नृत्य, ओम सत्यम संघ धावशीरे यांच्यातर्फे कळशी नृत्य, नाणूस येथील ईश्वर पार्वती महिला संघातर्फे धालो, साईनगर येथील एकता महिला संघातर्फे दांडिया, धाटवाडा येथील धाटवाडा-उसगांव सिटीझन फोरमतर्फे गोफ, पालवाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या पालक-शिक्षक संघातर्फे फुगडी, नाणूस येथील कलाकारांतर्फे घुमट आरती व तिस्क उसगांव येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळातर्फे दांडिया नृत्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमा दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱया प्रेक्षकांना बक्षिसे देण्यात आली. मोफत असलेले महाबक्षीस नाणूस येथील रतिका मडकईकर यांना प्राप्त झाले. नरेश नाईक यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय बागकर यांनी तर अशोक नाईक यांनी आभार मानले.
उसगावांतील पत्रकारांना दिवाळीची भेट
आपल्या भाषणा दरम्यान मंत्री विश्वजीत राणे यांनी उसगांव येथील पत्रकारांना येत्या दोन महिन्यात संगणक व इतर आवश्यक सुविधा असलेला सुसज्ज असा ‘न्यूज रुम’ उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. एका अर्थाने ही दिवाळीची भेटच ठरली. उपस्थित पत्रकार व प्रेक्षकांनी त्यांच्या या घोषणेचे जोरदार टाळय़ांनी स्वागत करुन आनंद व्यक्त केला. उसगाव भागात घडणाऱया घटना त्वरीत लोकांपयर्यंत पोचाव्यात यासाठी हा ‘न्यूज रुम’ सुरु करीत असल्याचे त्यांनी सांगितले.









