कपिलेश्वर मंदिरासमोरील पुलाशेजारी रस्त्यावर खोदाईमुळे वाहतूक कोंडी : भाविकांतून नाराजी
बेळगाव : पहिल्या श्रावण सोमवारी कपिलेश्वर मंदिर येथे भक्तांची नेहमीच गर्दी होत असते. त्याच वेळेत पुलाजवळ पाण्याची गळती काढण्यासाठी खोदाई करण्यात आली. यामुळे पुलावर आणि पुलाच्या बाजूला असलेल्या दोन्ही रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसपीएम रोडवरील पुलाशेजारीच गेल्या काही दिवसांपासून पाण्याची गळती सुरू होती. त्याची खोदाई करण्यात येत होती. यासाठी जेसीबीही आणण्यात आला होता. श्रावण असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने कपिलेश्वर मंदिरकडे येत होते. याचबरोबर पुलावरूनही ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक होती. याचवेळी ही खोदाई करण्यात आली. त्यामुळे लांबचलांब रांगा लागल्या होत्या. श्रावण सोमवारीच महापालिकेने हे काम हाती घेतले. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक इतर कोणत्याही दिवशी खोदाई केल्यास चालली असती. मात्र पहिल्याच श्रावण सोमवारी भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला. यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









