निपाणी येथील देवचंद कॉलेज येथे आयोजन : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची माहिती
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंतीदिनी 19 फेब्रुवारीला निपाणी येथील देवचंद कॉलेज येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान कोल्हापुरात सुरू केलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्ष येथे 24 डिसेंबर 2022 ते 6 फेब्रुवारी 2023 या कालावधीत 173 अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने यांच्या पुढाकाराने सीमाभागातील तरुणांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात 31 शासकीय विभाग सहभागी होणार असून ते संबंधितांकडून रोजगार योजनांबाबतचे फॉर्म भरून घेणार आहेत. तसेच अनेक खासगी कंपन्यांनाही निमंत्रित केले आहे. त्यांच्याकडून जागेवरच पात्र उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत.
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने व महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे लक्ष्मीकांत पाटील म्हणाले, सीमाभागातील तऊणांना रोजगार उपलब्ध व्हावा, या अनुषंगाने समितीतर्फे खासदार धैर्यशील माने यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा मेळावा घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. यामुळे सीमाभागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या माध्यमातून सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे राहिल्याबद्दल आभारी आहे.
मुख्यमंत्री सचिवालयाच्या कक्षाकडे 173 अर्ज
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सुऊ केलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येथे 24 डिसेंबर 2022 ते 6 फेब्रुवारी 2023 या कालावधित 173 अर्ज दाखल झाले. यापैकी 64 प्रकरणे निकाली निघाली असून उर्वरित लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांनी अर्ज देताना ते एकाचवेळी या कक्षासह जिल्हा प्रशासनाकडे देऊ नयेत. ते पहिल्यांदा जिल्हा प्रशासनाकडे दिल्यास सोयीचे होईल. तसेच नागरिकांनी न्यायिक व अर्धन्यायिक प्रकरणे या कक्षात दाखल करू नयेत.









