जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये ताण देणाऱ्या पावसाचे पुनरागमन झाल्याने देशवासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. किंबहुना, सप्टेंबरमध्ये किती आणि कसा पाऊस होतो, यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. जून ते सप्टेंबर हे पावसाळ्याचे प्रमुख चार महिने मानले जातात. यातील जूनमध्ये पावसाने पाठ फिरविली, तर जुलैमध्ये काहीसा समाधानकारक पाऊस झाला. तथापि, ऑगस्ट वाया गेल्याने चिंता वाढलेल्या दिसतात. एल निनोचा प्रभाव, कमी दाबाच्या क्षेत्राचा अभाव, मेडन ज्यूलीयन ओसियनची तीव्रता तसेच तटस्थ इंडियन ओशन डायपोलमुळे यंदाचा ऑगस्ट महिना 1901 नंतरचा दुष्काळी महिना ठरला आहे. या कालावधीत देशभरात केवळ 9 दिवस पाऊस होणे, यातूनच काय ते स्पष्ट होते. या महिन्यात देशात 161.7 मिमी एवढा पाऊस नोंदविला गेला आहे. सरासरीचा विचार करता ही तूट उणे 36 टक्के इतकी असल्याचे आकडेवारी सांगते. संपूर्ण देशातील पावसाच्या स्थितीवर नजर टाकली, तर यंदाचे वर्ष हे दुष्काळसदृश असल्याची खात्री पटते. तेलंगणा व हिमाचल प्रदेश अशा एखाद दुसऱ्या राज्याचा अपवाद वगळता कोणत्याही राज्यात सरासरीहून अधिक पाऊस झालेला दिसत नाही. हे चित्र काळजी वाढविणारेच ठरावे. कृषी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य होय. मात्र, महाराष्ट्रात यंदा म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. 1 जून ते 9 सप्टेंबर यादरम्यान महाराष्ट्रात सरासरी 878 मिमी पाऊस पडतो. परंतु, आत्तापर्यंत 802 मिमी इतक्याच पावसाची नोंद झालेली आहे. उजनी, जायकवाडीसह राज्यातील अनेक धरणांना अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. दीर्घ खंडानंतरच्या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली असली, तरी पीकपाण्याच्या दृष्टीने अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा असेल. कर्नाटकमधील स्थिती तर महाराष्ट्रापेक्षा बिकट म्हणावी लागेल. तेथे 715 मिमी इतकी सरासरी असताना तेथे केवळ 584 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तेथील तूट तब्बल 18 टक्के इतकी आहे. कृषी अर्थकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या राज्यातही सप्टेंबरच सारी भिस्त असेल. केरळ हे राज्य मान्सूनचे प्रवेशद्वार मानले जाते. पाऊस, पाणी, निसर्ग, पर्यटन हे घटक या राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देतात. मात्र, तेथील तूट तब्बल उणे 43 टक्के इतकी असल्याचे दिसते. पंजाब, गुजरात ही राज्येही अनुक्रमे 11 व 9 टक्के तुटीत पहायला मिळतात. याशिवाय हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, प. बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, झारखंड यांच्यासह ईशान्येतील राज्येही अवर्षणात आहेत. स्वाभाविकच सप्टेंबरमधील पावसावर आशा असतील. देशातील सध्याची परिस्थिती पाहता सुऊवात तर नक्कीच चांगली झाली आहे. महाराष्ट्र, ओरिसा, कर्नाटक, केरळसह दक्षिणेत समाधानकारक स्थिती दिसते. मात्र, उत्तरेकडील राज्ये अद्यापही पावसाकडे डोळे लावून बसली आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबरमध्ये सरासरीइतका पाऊस राहण्याची चिन्हे आहेत. सरासरीच्या 91 ते 109 टक्क्यांदरम्यान हा पाऊस राहील. हिमालयाचा पायथा, पूर्व भारत, पूर्व मध्य भारत, दक्षिण भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस या महिन्यात राहील, तर उर्वरित भारतात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास सप्टेंबर महिन्यात कमी पावसाचा अंदाज आहे. तथापि, सप्टेंबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पाऊस दमदार राहण्याची शक्यता आहे. त्याचे प्रमाणच काय ते ठरवेल. परतीच्या पावसाचे म्हणूनही एक महत्त्व आहे. सर्वसाधारणपणे 14 सप्टेंबरनंतर राजस्थानपासून परतीचा मान्सून सुरू होतो. 2 सप्टेंबरनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. याच्या प्रभावामुळे राजस्थानसह वायव्य भारतात दमदार पाऊस होणार आहे. मध्य भारतातही यामुळे पाऊस राहणार आहे. त्यामुळे परतीच्या मान्सूनची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत, असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे पाऊस लांबणार का, याकडेही लक्ष द्यावे लागेल. सध्या प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती तटस्थ आहे. मात्र, आता याचा प्रभाव आता वाढणार असून, यावर्षीची थंडी तसेच 2024 च्या सुऊवातीपर्यंत तो राहणार आहे. सध्या इंडियन ओशन डायपोल तटस्थ असला तरी येथून पुढे तो पॉझिटिव्ह स्थितीत येणार आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्य पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याचे हवामान विभाग सांगतो. हा पैलूही ध्यानात घेतला पाहिजे. दुसऱ्या बाजूला यंदाचा ऑगस्ट हा सर्वाधिक उष्ण महिना ठरला असल्याचा जागतिक हवामान संघटनेचा निष्कर्ष चिंताजनकच म्हटला पाहिजे. जागतिक हवामान संघटना आणि ‘कोपर्निकस’ ही युरोपमधील हवामान संस्था यांनी यासंदर्भात अहवाल दिला आहे. या अहवालामुळे अनेक बाबींवर झगझगीत प्रकाश पडला असून, आता त्याकडे डोळसपणे पाहणे, ही काळाची गरज ठरते. सजीवसृष्टीच्या दृष्टीने हवामान हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण हवामानात होणाऱ्या विविध बदलांचे सृष्टीवर परिणाम होत असतात. म्हणूनच हा विषय गांभीर्याने घेणे क्रमप्राप्त ठरते. मोरोक्कोमध्ये 11 ऑगस्टला प्रथमच पारा 50 अंशांच्या वर जाणे, पॅनडात 17 ऑगस्टला सहाशेहून अधिक वणवे पेटणे, बीजिंगमध्ये सात ऑगस्टला 744 मिमी इतक्या पावसाची नोंद होणे, याशिवाय अमेरिकेतील 31 दिवसांची उष्णतेची लाट, ग्रीसमधील कडक उन्हाळा, समुद्रावरील सरासरी तापमान 20.96 अंश सेल्सिअसवर जाणे, हे हवामानातील सारे घटक गंभीर आहेत. कोळसा, तेल, हरित वायूंचा वाढता वापर ही तापमानवाढीची काही मानवनिर्मित कारणे असून, त्याला एल निनोच्या प्रभावामुळेही हातभार लागत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. भारतातील पावसाची तूट किंवा जगातील विविध देशांमधील स्थिती या साऱ्याच्या मुळाशी मानवी हस्तक्षेप हाच मूळ घटक आहे, हे लक्षात घ्यायला हवे. म्हणूनच सर्वच देशांनी कार्बन वायू उत्सर्जन रोखतानाच पर्यावरण संरक्षणासाठी पुढे यायला हवे. पुढचे काही दिवस सर्वदूर चांगला पाऊस होईल नि भारताची ही भूमी सुजलाम् सुफलाम् होईल, अशीच अपेक्षा कऊयात.