ओल्ड गोव्यातील वादग्रस्त बंगल्याचे प्रकरण
प्रतिनिधी /पणजी
ओल्ड येथे जागतिक वारसास्थळाचा दर्जा लाभलेल्या सेंट केजिटन चर्च परिसरात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या तसेच गेल्या कित्येक दिवसांपासून वादग्रस्त बनलेल्या बंगल्याचे बांधकाम पाडण्याचा आदेश भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने (एएसआय) जारी केला आहे. दुसऱया बाजूने उच्च न्यायालयाने बांधकाम पाडण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी याबाबतचे एक पत्र पश्चिम बंगालच्या टीएमसीच्या लोकसभा खासदार महुआ मोईत्रा यांना पाठविले आहे. यापुर्वी बेकायदेशीर बांधकामाविषयी लोकसभेत शून्य तासात मोईत्रा यांनी प्रश्न उपस्थित करून ते बांधकाम पाडण्याची मागणी केली होती. त्यावर केंद्रीय पर्यटनमंत्र्यांनी मोईत्रा यांना हे पत्र पाठवले आहे.
प्राचिन स्मारके व पुरातत्वस्थळे, अवशेष कायदा 1958 अंतर्गत हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश एएसआयने 16 ऑगस्ट 2022 रोजी जारी केला होता. त्यामुळे बेकायदेशीर बांधकामावर त्वरित कारवाई करणे जरुरीचे होते. हे बांधकाम पाडावे म्हणून अनेकवेळा आंदोलन झाले, पण अजूनपर्यंत ते पाडण्यात आलेले नाही.
या बांधकामाला दिलेला परवाना रद्द करून हे बांधकाम का पाडू नये, अशी नोटीस ओल्ड गोवा पंचायतीने जारी केली आहे. या नोटीसीला बांधकाम मालकाने पंचायत खात्याकडे आव्हान दिले आहे. त्यानुसार पंचायत खात्याकडेही सुनावणी सुरु आहे.









