कॅन्टोन्मेंटमध्ये संभ्रमाचे वातावरण
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण करण्याची प्रक्रिया एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे मात्र नवीन बिल्डिंग बायलॉज तयार करण्याचे काम सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत बिल्डिंग बायलॉजचे काम पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांसह नागरिकही संभ्रमात सापडले आहेत. कॅन्टोन्मेंटचे हस्तांतरण होत असताना नवीन बिल्डिंग बायलॉज तयार करण्याची गरजच काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
डायरेक्टोरेट जनरल ऑफ डिफेन्स इस्टेट (डीजीडीई)ने नवीन बिल्डिंग बायलॉज तयार करण्याची सूचना केली आहे. सिव्हिल, तसेच बंगलो एरियासाठी ही नवी नियमावली तयार केली जाणार आहे. बेळगावसह सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. बिल्डिंगचे बांधकाम करताना असणारी नियमावली या बायलॉजमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. वेळ कमी असल्याने खासगी एजन्सीकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डचे स्थानिक महापालिकांमध्ये हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात वरचेवर बैठका घेतल्या जात आहेत. तसेच कागदपत्रांची जमवाजमवही सुरू आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डची यामध्ये सर्वात आघाडी असल्याचे दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. संरक्षण मंत्रालयाने याबद्दल बेळगावचे विशेष उदाहरण दिले होते. एकीकडे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे मात्र नवीन बायलॉज केले जात आहे. बांधकाम करताना एफएसआय कसा निश्चित करावा, यासंदर्भात नियमावली केली जाणार आहे. यामुळे सर्वचजण संभ्रमात आहेत. कॅन्टोन्मेंट हस्तांतरण प्रक्रिया गुंतागुंतीची असल्यामुळे अजून कालावधी लागणार असल्यामुळे बायलॉज तयार केला जात आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.









