अखेर मनपाला जाग : कचरा संकलनासाठी धावणार : महापौरांनी केल्या गाड्या वापराबाबत सूचना
बेळगाव : शहरातील ओला व सुका कचरा स्वतंत्र जमा करण्यासाठी खरेदी करण्यात आलेले 58 ऑटो टिप्पर्स जाग्यावर पडून आहेत. याबाबत मनपाला आता जाग आली असून महापौरांनी या गाड्या वापराबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे पडून असलेल्या ऑटो टिप्पर्स कचरावाहू गाड्यांसाठी मनपा अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. सदाशिवनगर येथील मनपाच्या गॅरेजमध्ये मागील काही दिवसांपासून ही कचरावाहू वाहने जाग्यावर पडून आहेत. आता महापौर-उपमहापौर निवडणुकीनंतर सभागृह अस्तित्वात आले आहे. त्यामुळे या मालवाहू गाड्यांना चालना देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, खरेदी केलेल्या या कचरावाहू वाहनांची नोंदणी व इन्शुरन्स रखडले आहे. त्यामुळे प्रथमत: या गाड्यांची रितसर नोंदणी व इन्शुरन्स उतरावा लागणार आहे. शिवाय या कचरावाहू वाहनांवर चालकांची नेमणूक करावी लागणार आहे.
वाहनांची पाहणी
ही कचरावाहू वाहने रस्त्यावर आणण्यासाठी मनपाला इन्शुरन्स, रितसर नोंदणी आणि चालकाची उणीव दूर करावी लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात ही वाहने कचरा संकलनासाठी शहरात फिरताना दिसणार आहेत. याबाबत शनिवारी महापौर शोभा सोमनाचे यांनी उपमहापौर, नगरसेवक व मनपा अधिकाऱ्यांना घेऊन कचरावाहू वाहनांच्या गॅरेजला भेट दिली. शिवाय सद्यपरिस्थितीत या कचरावाहू वाहनांची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना ही कचरावाहू वाहने लवकरच रस्त्यावर आणण्याच्या सूचना केल्या.
डिझेल शवदाहिनीसाठी हालचाली गतिमान
महापौर-उपमहापौर आणि नगरसेवकांनी येथील डिझेल शवदाहिनीला भेट दिली. शिवाय डिझेल शवदाहिनी गतिमान करण्याबाबत ठेकेदाराला सूचना करण्यात आल्या.









