सेन्सेक्समध्ये 846 अंकांची तेजी ः आयटी, धातू समभागांची चमक
वृत्तसंस्था/ मुंबई
गेली तीन सत्रे घसरणीत राहून गुंतवणूकदारांची चिंता वाढवणाऱया शेअरबाजाराने सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी दमदार तेजीसह कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. आयटी, धातू व ऑटो क्षेत्राच्या निर्देशांकाच्या दमदार कामगिरीचा लाभ बाजाराला झाला. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 846 अंकांच्या दमदार तेजीसह 60,747.31 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांकदेखील 241 अंकांच्या वाढीसह 18,101.20 अंकांवर बंद झाल्याचा पाहायला मिळाला. अमेरिकेत सेवा विस्ताराला संधी प्राप्त झाल्याची सकारात्मक बातमी आल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसला. दिवसभरात सेन्सेक्स निर्देशांक 989 अंकांपर्यंत वर चढला होता. महिंदा आणि महिंद्रा, एचसीएल टेक, टीसीएस, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, रिलायन्स, ऍक्सिस बँक, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या समभागांनी सोमवारी 2 ते 3.6 टक्के इतकी दमदार तेजी दर्शवत बाजाराला भक्कम पाठबळ दिले. सन फार्मा, आयटीसी, नेस्ले इंडिया यांचे समभागही तेजी राखून होते तर दुसरीकडे टायटन, बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी, गेसीम, बजाज ऑटो, एचडीएफसी लाइफ यांचे समभाग मात्र घसरणीत राहिले होते. सोमवारी शेअरबाजाराला आयटी, धातू, ऑटो व ऊर्जा क्षेत्राच्या निर्देशांकांनी चांगली साथ दिली होती.
जागतिक बाजारात सोमवारी सकारात्मक कल राहिला होता. अमेरिकेतील बाजार तेजीसह कार्यरत होते. यात डोव्ह जोन्स 700 अंकांनी व नॅसडॅक 264 अंकांसह तेजी दर्शवत होता. युरोपातील बाजारातही तेजीचा सूर जाणवत होता. तर आशियाई बाजारात तेजी होती. ज्यात हँगसेंग 396 अंक, निक्की 153 अंक, कोस्पी 60 अंक, स्ट्रेट टाइम्स 28 अंक, शांघाय कम्पोझीट 18 अंक तसेच सेट कम्पोझीट 17 अंकांच्या वाढीसह कार्यरत होते.









