गडमुडशिंगी ग्रामपंचायतीवर महाडिक गटाची सत्ता अबाधित
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महाडिक गटाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गडमुडशिंगी गावात सत्तांतर झाल्याच्या बातम्या काल प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पण सतेज पाटील गटात प्रवेश केलेल्या सरपंच आश्विनी अरविंद शिरगावे त्यापूर्वीच अपात्र ठरल्या असल्याचा धक्कादायक खुलासा आज गावचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केला. तसेच गावामध्ये आजही महाडिक गटाकडे बहुमत असून सत्तांतराच्या बातम्या बोगस असल्याचाही खुलासा त्यांनी यावेळी केला.
यावेळी बोलताना तानाजी पाटील म्हणाले,”आपण देवदर्शनासाठी बाहेर गेल्याची संधी शोधून विरोधी गटाचे नेते सतेज पाटील यांनी खेळलेला हा डाव पूर्णपणे फसला आहे. त्यांनी प्रवेश करून घेतलेले दोन्ही सदस्य संपर्कात असून लवकरच ते स्वगृही परततील. आणि सरपंच आश्विनी शिरगावे यांचे सदस्यत्व प्रवेशापूर्वीच अपात्र ठरलेले असल्यामुळे हा सगळा खोटा बनाव केवळ प्रसिद्धीसाठी रचला गेला होता.”
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात निधी गावासाठी आणला. याची धास्ती घेऊन विरोधकांनी खालच्या पातळीला जाऊन राजकारण करत हा सर्व खेळ खेळला पण यात ते अपयशी ठरले असून, इथून पुढच्या काळात तरी विरोधकांनी नैतिकता पाळून राजकारण करावे असा उपरोधिक टोलाही तानाजी पाटील यांनी यावेळी लगावला. तसेच ज्यांना पश्चाताप झाला त्यांच्यासाठी दारं उघडी असतील पण गद्दारांना मात्र क्षमा केली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
यावेळेस जितेंद्र यशवंत, अमित माळी, अशोक दांगट, इंदुबाई कोगे, द्रौपदी सोनुले, संगीता गोसावी, संपदा पाटील, अरविंद मुडशिंगीकर, अनिल पाटील, सचिन पाटील, मनीष पाटील, सुभाष पाटील, रामचंद्र शिरगावे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.