जिल्हय़ात 36 ठिकाणी छापे : 310 जुगाऱयांना अटक, पावणे तीन लाख रुपये जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानंतर मोठय़ा प्रमाणात जुगार रंगतो. या जुगारात खेळणारे हमालापासून ते व्यापाऱयापर्यंत आपले आर्थिक वर्ष कसे जाणार, याचे नशीब आजमावतात. याचाच नेमका अंदाज बांधून दिवाळीच्या जुगारावर जिल्हय़ात 36 ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले आहेत. या कारवाईत 310 जणांना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. बुधवारी रात्री वेगवेगळय़ा पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात 36 ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले आहेत. 310 जणांना अटक करून त्यांच्याजवळून 2 लाख 75 हजार 45 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
जिल्हय़ातील बारा पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी दिलेल्या माहितीनुसार रामदुर्ग व सौंदत्ती पोलिसांनी प्रत्येकी 7 जुगारी अड्डय़ांवर छापे टाकले आहेत. कटकोळ पोलिसांनी 3 ठिकाणी कारवाई केली आहे.
मुरगोड पोलिसांनी 2, गोकाक ग्रामीण पोलिसांनी 5, अंकलगी पोलिसांनी 2, सदलगा, कागवाड, नेसरगी, कित्तूर पोलिसांनी प्रत्येकी 1, बैलहोंगल पोलिसांनी 4 व दोडवाड पोलिसांनी 2 ठिकाणी छापे टाकले आहेत. अत्यंत नियोजनरितीने ही कारवाई केली गेली आहे. दसरा-दिवाळीत अनेक ठिकाणी जुगार रंगतात. याची माहिती मिळवूनच पोलिसांनी एकाचवेळी 36 जुगारी अड्डय़ांवर कारवाई केली आहे.
बेळगाव जुगारमुक्त झाले का?
जिल्हा पोलिसांनी 36 ठिकाणी छापे टाकून जुगाऱयांवर धडक कारवाई केली आहे. मात्र, बेळगाव शहर परिसरात छापा टाकल्याची एकही बातमी नाही. त्यामुळे बेळगाव शहर मटका-जुगार मुक्त झाले आहे का? की खाकीशी संगनमत करून अंदर-बाहरचे डाव रंगत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बेळगाव परिसरात मोठय़ा प्रमाणात मटका, जुगार सुरू असूनही एकाही अड्डय़ावर कारवाई झालेली दिसत नाही.









