ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात 7 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार कॅनॉट पॅलेस पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच अनेक महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यामध्ये काही मुलींचाही समावेश होता. या विरोधात विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह अनेक खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेत दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले होते. याची दिल्ली महिला आयोगाने दखल घेतली होती. क्रीडा मंत्रालयानेही या प्रकरणाच्या तपासासाठी एक चौकशी समिती नेमली होती.
त्यानंतर आता हरियाणा आणि बाहेरील कुस्तीपटूंकडून एकूण सात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 7 महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कॅनॉट पॅलेस पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. आम्ही कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या तक्रारींची चौकशी करत असून, मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे एफआयआर नोंदवला जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.









