पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप खासदारांना संदेश
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीला आता केवळ 400 दिवस उरले असून भाजपच्या सर्व खासदारांनी त्यांच्या मतदारासंघांमधील विकासकामांचा वेग वाढवावा, आणि मतदारांचे केंद्र सरकारच्या गेल्या 9 वर्षांमधील भरीव कामगिरीसंबंधी प्रबोधन करावे, असा महत्वपूर्ण संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना दिला आहे. ते खासदारांच्या बैठकीत भाषण करीत होते.
या बैठकीचे आयोजन त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी विशेषत्वाने मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. सर्व खासदारांनी जास्तीत जास्त मतदारांच्या संपर्कात रहावे. त्यांच्या भेटी घ्याव्यात. मतदारसंघांच्या कानाकोपऱयात जाऊन त्यांच्याशी संवाद करावा. आपण त्यांच्या सातत्याने संपर्कात राहिलात तर आपल्याविरोधात प्रस्थापित विरोधी भावना निर्माण करण्याची शक्यता निर्माण होणार नाही. नुकताच सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प गरीब, मध्यमवर्गिय, नोकरदार, महिला आणि सर्व कमी उत्पन्नाच्या घटकांचा विचार करुन सादर करण्यात आलेला आहे. या प्रत्येक समाजघटकाच्या प्रगतीची द्वारे उघडी करण्याचा सरकारचा निर्धार आहे. खासदारांनी या अर्थसकंल्पासंबंधी सविस्तर माहिती लोकांना द्यावी. यात कोणतेही दुर्लक्ष नको, असा संदेश त्यांनी दिला.
2024 च्या लोकसभेसाठी सज्जता
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसून प्रयत्न सुरु केले आहेत. केवळ भाजपने नव्हे, तर सर्वच पक्षांनी आता तयारी सुरु केली आहे. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. खासदार, नेते आणि कार्यकर्त्यांना आता वेळ दवडता येणार नाही. निवडणुका डोळय़ांसमोर ठेवूनच भाजपने अर्थसकंल्प सादर केला अशी हाकाटी पिटण्यास विरोधी पक्षांनी सुरुवात केली आहे. पण हा अर्थसंकल्प सर्वांच्या लाभासाठी असला तरी तो निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून सादर करण्यात आलेला नाही. देशाचे व्यापक हित साधणे हे या अर्थसंकल्पाचे ध्येय असून खासदारांनी मतदारांना यासंबंधी अवगत करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.









