वृत्तसंस्था/ मुंबई
रणजी चषक विजेत्या मुंबई संघाचे प्रमुख प्रशिक्षकपद ओम्कार साळवीने यापुढेही कायम राखले आहे. सदर माहिती मुंबई क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने दिली. त्याचप्रमाणे मुंबई क्रिकेट निवड समिती प्रमुखपदी संजय पाटीलची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणी समितीचे बैठक नुकतीच झाली आणि त्यामध्ये 2024-25 च्या क्रिकेट हंगामासाठी विविध नव्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. यापूर्वी मुंबई निवड क्रिकेट समिती प्रमुखपदी राजू कुलकर्णीकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. पण आता मुंबई क्रिकेट संघटनेच्या सुधारणा समिती प्रमुखपदी राजू कुलकर्णीची नियुक्ती करण्यात आल्याने त्याच्या जागी संजय पाटीलची नव्याने नेमणूक करण्यात आली आहे. संजय पाटील मुंबईचे माजी क्रिकेटपटू असून त्यांनी 1989-90 तसेच 1993-94 या कालावधीत 33 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. मुंबई निवड समिती प्रमुखपदी संजय पाटीलची नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता त्यांच्याकडे 23 वर्षाखालील वयोगटाच्या निवड समितीचे आणि वरिष्ठ पुरूषांच्या निवड समितीचे अशी दोन्ही प्रमुखपदे राहतील. या निवड समितीमध्ये रवि ठाकर, जितेंद्र ठाकरे, किरण पोवार, विक्रांत येलीगटी यांचा समावेश आहे. मुंबई आणि बडोदा संघाचे माजी क्रिकेटपटू राजेश पवारकडे मुंबईच्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 19 वर्षाखालील मुंबई संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी दिनेश लाड तर या वयोगटातील संघ निवड समिती प्रमुखपदी दिपक जाधवची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवड समितीमध्ये मंदार फडके, उमेश गोटखिंडकर, भविन ठक्कर आणि पीयूष सोनेजी यांचा समावेश आहे. मुंबईच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी सुनेत्रा परांजपेची तर मुंबईच्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या महिला क्रिकेट संघ प्रमुख प्रशिक्षकपदी अजय कदमची नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांच्या वरिष्ठ आणि 23 वर्षाखालील क्रिकेट संघाच्या निवड समिती प्रमुखपदी लाया फ्रान्सीसची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये सीमा पुजारी, शारदा चव्हाण, शितल सकरु, कल्पना कार्डोसो यांचा समावेश आहे. सर्वेश दामले मुंबईच्या 19 वर्षाखालील महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी राहितील. तर निवड समिती प्रमुखपदी सुनीता सिंगची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवड समितीमध्ये अपर्णा चव्हाण, संगीता कामत, विणा परळकर, कल्पना मुरकर यांचा समावेश आहे.









