प्रतिनिधी
बांदा
दोडामार्ग – तिलारी परिसरातून ओंकार हत्ती आता बांदा परिसरातील नेतर्डे भागात पोहोचला आहे. नेतर्डे – धनगरवाडी येथील पाणवठा भागात हत्ती स्थिरावल्याची माहिती वनविभागाने दिली. वनविभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जलद कृती दलाचे जवान हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. दोडामार्ग घोटगे, मोर्ले भागातून कळणे, उगाडे, डेगवेतून सदर हत्ती आता डोंगरपाल, नेतर्डे भागात स्थिरावला आहे. सध्या हत्ती झोपी गेला असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गोवा वनविभागाचे पथकही सीमा भागावर तैनात असून सदर हत्ती गोवा भागात येता नये याची ते दक्षता घेत आहेत. डोंगरपाल हायस्कूल नजीक हत्ती स्थिरावल्याने हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सकाळीच सुट्टी देण्यात आली. स्थानिक ग्रामस्थही वनविभागाच्या मदतीला आहेत.









