वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे गांदरबल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. यासंबंधीची घोषणा लोकसभा खासदार रुहुल्लाह मेहदी आणि पक्षाचे प्रांतीय अध्यक्ष नासिर अस्लम वानी यांनी रविवारी केली आहे. यावेळी ओमर अब्दुल्ला आणि एनसीचे वरिष्ठ नेते तसेच अनंतनाग-राजौरीचे खासदार मियां अल्ताफ अहमद हे उपस्थित होते.
तर यापूर्वी ओमर अब्दुल्ला यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. जोपर्यंत केंद्र सरकार जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देत नाही तोवर निवडणूक लढविणार नसल्याचे ओमर यांनी म्हटले होते. परंतु त्यांनी स्वत:च्या घोषणेपासून घुमजाव करत गांदरबल मतदारसंघाची निवड केली आहे.
ओमर अब्दुल्ला हे 2009-15 या कालावधीत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तसेच तीनवेळा ते लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 2008-14 पर्यंत त्यांनी गांदरबल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तर 2014-19 या कालवधीत ते बीरवाह विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते।









