अध्याय अकराव
बाप्पांनी राजाला तीन प्रकारचे दु:ख आणि तीन प्रकारचे सुख कोणते असते ते समजावून सांगितले. ह्यातील सात्विक दु:ख सुरवातीला कष्टप्रद असले तरी अंती समाधान मिळवून देते पण उर्वरित राजस आणि तामस दु:ख माणसाला आणखीन आणखीन दु:खातच लोटते. तीच गोष्ट सात्विक, राजस आणि तामस सुखाची आहे. सात्विक सुख हे माणसाच्या समाधानात वाढ करते तर राजस आणि तामस सुखे माणसाला शेवटी दु:खातच ढकलतात. ह्यावरून जर माणसाला वाटले की, आपल्यात फक्त सत्वगुणच असावा तर ते शक्य नसते कारण हे विश्व आणि त्यातील प्रत्येक वस्तू मायेच्या सहाय्याने तयार झाल्या आहेत आणि माया तर त्रिगुणांनी युक्त असते. त्यामुळे सर्व वस्तू त्रिगुणात्मकच असतात. म्हणून बाप्पा पुढील श्लोकात बाप्पा म्हणतात, या विश्वातल्या सर्व वस्तू त्रिगुणात्मक आहेत अगदी ब्रह्म देखील त्याला अपवाद नसून तीन प्रकारचे आहे.
राजन्ब्रह्मापि त्रिविधमोंतत्सदिति भेदतऽ ।
त्रिलोकेषु त्रिधा भूतमखिलं भूप वर्तते ।। 26 ।।
अर्थ- हे राजा, ब्रह्म देखील?, तत् आणि सत् या भेदांनी तीन प्रकारचे आहे. त्रैलोक्यामधील सर्वच गोष्टी तीन प्रकारच्या आहेत.
विवरण- मनुष्य ज्या दैवताची उपासना करतो त्याच्या लोकाला मृत्यूनंतर जातो. असे चौदा लोक आहेत.
ब्रह्मलोक हा चौदा लोकांपैकी सर्वश्रेष्ठ मानला जातो. मनुष्य पुण्यकर्मे करत जरी तिथपर्यंत पोहोचला तरी त्याचा पुनर्जन्म चुकत नाही. पुनर्जन्म चुकवण्यासाठी वैकुंठप्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. पुनर्जन्म टाळण्यासाठी ईश्वराच्या पायाशी स्थान मिळवणं हे भक्तांचं अंतिम उद्दिष्ट असायला हवं, ह्या अर्थाचा एक श्लोक श्रीमदभगवद्गीतेच्या आठव्या अध्यायात आहे भगवंत म्हणतात,
ब्रह्मादि लोक ते सारे माघारी घालती पुन्हा । माझी भेट घडे तेव्हा जन्मणे मग खुंटले ।।8.16।।
ब्रह्मदेव व ब्रह्मलोकाचा समावेश ईश्वरनिर्मित विश्वात होतो. त्यामुळे ईश्वरनिर्मित इतर गोष्टीप्रमाणे ब्रह्म हेही तीन प्रकारचे आहे. ओम, तत, सत अशी ब्रह्माची तीन नावे श्रुतिनी सांगितली आहेत. ओंकाराचा उच्चार अत्यंत पवित्र आहे. म्हणून त्याचा उच्चार करून केलेली कर्मे ईश्वराला अर्पण करावीत. म्हणजे माणसाच्या मनात मी कर्ता आहे असे मनात ठाण मांडून बसलेले विचार आणि त्यामुळे झालेला अहंकार व फलेच्छा नाहीशा होतात. ह्या तीन गोष्टींमुळे मनुष्य करत असलेलं कर्म दोषपूर्ण होतं कारण आपण कर्ते आहोत हा विचारच मुळात चुकीचा असल्याने कर्म केल्याचा अहंकार आणि फळाची इच्छा यावर आपला अधिकार आहे, असे समजणे ह्या गोष्टी आपोआपच चुकीच्या ठरतात. अशी चूक हातून घडू नये म्हणून ईश्वरानं दिलेलं कर्म त्यानंच दिलेल्या प्रेरणेनुसार करून त्यालाच अर्पण केलं की, आपण निर्लेप होतो व केलेलं कर्मही निर्दोष होतं. ह्या पद्धतीने वागत गेल्यास आपले नवीन प्रारब्ध तयार होत नाही. म्हणून सतत ईश्वराचे स्मरण करण्याचा सराव करावा. म्हणजे ईश्वर कर्ता आहे ह्याची आपल्याला नेहमी जाणीव राहते आणि त्यामुळे आपल्यावर असलेला त्रिगुणांचा प्रभाव हळूहळू निष्प्रभ व्हायला सुरुवात होते. सुरवातीला कोणतेही काम केल्यावर मनुष्य खुश होतो किती छान आणि टापटीपीने काम केलंय म्हणून स्वत:ला शाबासकी देतो, इतरांच्यापेक्षा किती सुबक झालंय हाही विचार मनात येतो. आपलं आपल्यालाच कौतुक वाटू लागतं. त्यावेळी ईश्वराची आठवण झाली नाही तर केलेल्या कामाचा अहंकारही वाटू लागतो पण जर मी कर्म करत नसून ईश्वर कर्ता आहे असा विचार चोरपावलांनी का होईना मनात शिरला की, आपल्या अहंकाराच्या फुग्याला टाचणी लागलीच म्हणून समजा. अशी ईश्वराच्या कर्तेपणाची जाणीव सतत होत राहिली की, आपण वर सांगितल्याप्रमाणे निर्लेप होऊ लागतो.
क्रमश:








