आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते उद्घाटन,जलतरणपटू बेळगावकरांतून समाधान
बेळगाव : अशोकनगर येथे बांधण्यात आलेल्या महापालिकेच्या ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाचे बुधवार दि. 17 रोजी आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. अशोकनगर येथे माजी आमदार फिरोज सेठ यांच्या कार्यकाळात बांधलेल्या जलतरण तलावाचे लोकार्पण करण्यात आल्याने जलतरणपटू व बेळगावकरांतून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले, बेळगावच्या जलतरण पटूंसाठी ही आनंदाची बाब आहे. 50 मीटर लांबीचा जलतरण तलाव दहा वर्षापूर्वी आपले बंधू माजी आमदार फिरोज सेठ यांनी दुरदृष्टीने बांधला होता. बेळगावमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू निर्माण व्हावेत, या उद्देशाने त्यांनी हा तलाव बांधला होता. गरीब आणि मध्यमवर्गीय मुलांनाही संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. विनायकनगर आणि जाधवनगरमधील जलतरण तलावांचे लवकरच लोकार्पण होणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
दरम्यान महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी आमदारांच्या निधीतून बांधलेल्या सदर स्विमींग पुलचे लोकार्पण करण्यासाठी तांत्रिक अडचण आल्याचे सांगितले. मात्र आमदार आसिफ सेठ यांच्या नेतृत्वाखाली आणि नगरसेवक, आभा फौंडेशन आणि अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तलाव विकसित करून लोकांसाठी तो समर्पित करण्यात आला आहे. बेळगावातील खेळाडू आणि सरकारी शाळेतील विद्यार्थी आणि गरीब मुलांना परवडणाऱ्या किमतीत महानगरपालिकेकडून हा जलतरण तलाव उपलब्ध करून दिला जाणार आहे. आबा फौंडेशनचे प्रमुख पवार म्हणाले, आमदारांच्या सहकाऱ्यांने इतक्या मोठ्या स्विमिंग पुलचे उदघाटन करण्यात आले आहे. अशोकनगरमधील हा स्विमिंग पूल ऑलिम्पिक दर्जाचा आहे. त्यामुळे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होण्यास मदत झाली आहे. जिर्ण अवस्थेत असलेला हा स्विमींग पूल सुरु करण्यासाठी महापालिकेनेही सहकार्य केले आहे. उद्घाटन कार्यक्रमाला महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, नगरसेवक रियाज किल्लेदार, मनपा आयुक्त शुभा बी. व इतर मान्यवरांच्या उपस्थित होते.









