सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द : 7 दिवसांत आत्मसमर्पण करावे लागणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्या प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाकडून बुधवारी मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुशील कुमारचा जामीन रद्द करत 7 दिवसांच्या आत आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. सागरचे पिता अशोक धनखड यांच्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. अशोक धनखड यांनी स्वत:च्या याचिकेत सुशील कुमारचा जामीन रद्द करण्याचे आवाहन केले होते. साक्षीदारांवर यापूर्वीही दबाव टाकला गेला होता आणि आत माझ्या परिवारावर पुन्हा तडजोडीसाठी दबाव टाकला जात असल्याचा दावा धनखड यांनी याचिकेत केला होता. या याचिकेवर न्यायाधीश संजय करोल आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने सुनावणी केली.
खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयाचा 4 मार्च रोजीचा आदेश रद्द केला आहे. या आदेशांतर्गत सुशील कुमारला जामीन मंजूर करण्यात आला होता. सुशील कुमारला 7 दिवसांच्या आत आत्मसमर्पण करावे लागेल असे न्यायाधीश करोल यांनी म्हटले आहे. तर उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यावर सुशील कुमारने उत्तर रेल्वेतील स्वत:च्या पदावर काम सुरू केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशील कुमारला आत्मसमर्पण करत पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. मे 2021 मध्ये दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटू सागर धनखड याची मारहाण करत हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सुशील कुमार आरोपी आहे. सागरच्या पित्याने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत सुशील कुमार आणि त्याच्या सहकारी कुस्तीपटूंनी मारहाण केल्याचा आरोप नमूद आहे.









