भारताच्या गटात जर्मनीचा समावेश, एफआयएच ऑलिम्पिक पात्रता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एफआयएच हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय महिला संघाला अवघड गट मिळाला असून या गटात जागतिक पाचव्या मानांकित जर्मनीचाही समावेश आहे. जानेवारी 13 ते 19 या कालावधीत ही स्पर्धा रांचीमध्ये होणार आहे.
भारतीय टप्प्यातील या पात्रता स्पर्धेतील जागतिक सहावा मानांकित भारतीय संघ हा दुसरा सर्वोत्तम संघ आहे. याशिवाय न्यूझीलंड (नववे मानांकन), जपान (11), चिली (14), अमेरिका (15), इटली (19) व झेक प्रजासत्ताक (25 वे मानांकन) या संघांचाही स्पर्धेत समावेश आहे. ऑलिम्पिकमधील स्थानासाठी स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे लढणाऱ्या अन्य आठ संघांत बेल्जियम, ग्रेट ब्रिटन, स्पेन, कोरिया, आयर्लंड, कॅनडा, मलेशिया, युक्रेन यांचा समावेश आहे.
पुरुषांची ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा मस्कत व व्हॅलेन्सिया येथे घेतली जाणार आहे. मस्कतमधील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आठ संघांत ग्रेट ब्रिटन, जर्मनी, न्यूझीलंड, मलेशिया, पाकिस्तान, कॅनडा, चिली व चीन यांचा तर व्हॅलेन्सियामध्ये होणाऱ्या स्पर्धेत बेल्जियम, स्पेन, कोरिया, आयर्लंड, जपान, ऑस्ट्रिया, इजिप्त, युक्रेन यांचा समावेश आहे. 16 महिला व पुरुष संघांचे त्यांच्या मानांकनानुसार दोन करण्यात आले आहेत. विविध खंडांतील स्पर्धा झाल्यानंतरचे त्यांचे मानांकन विचारात घेण्यात आले आहे.
पॅन अमेरिकन गेम्स व आफ्रिकन हॉकी रोड टू पॅरिस स्पर्धा संपल्यानंतर पाच पुरुष व महिला संघांना पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश मिळाला. यजमान असल्याने फ्रान्सलाही थेट प्रवेश मिळाला आहे. चार ऑलिम्पिक पात्रता स्पर्धांतील पहिले तीन संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील. अलीकडेच चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने सुवर्णपदक पटकावत ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे.









