श्वान किंवा कुत्र्याचे जास्तीत जास्त आयुष्य 12 ते 15 वर्षांचे असते. क्वचित तो 25 वर्षांपर्यंत जगतो. मात्र, एक कुत्रा असा आहे, की ज्याचा 31 वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला आहे. त्याचे नाव बॉबी असे असून तो आपल्या मालकाकडे पोर्तुगालमध्ये राहतो. त्याचा मालकाचे नाव लिओनेल कोस्टा असे आहे. तो या कुत्र्याची अगदी नीट काळजी घेतो. त्याला कधीही साखळीने बांधले जात नाही. हा कुत्रा अत्यंत ‘सोशल’ म्हणून ओळखला जातो.

नुकतेच या कुत्र्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद करण्यात आले असून तो जगातील आजपर्यंतचा सर्वात वयस्कर ज्ञात श्वान ठरला आहे. त्याला तसे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. गावातील वातावरण शांत आणि स्वच्छ असल्याने कुत्र्याचे आयुष्य इतके वाढले, असे त्याच्या मालकाचे म्हणणे आहे.
हा श्वानही अत्यंत शांत स्वभावाचा आहे. तो कोणावरही रागवत नाही किंवा गुरगुरत नाही. तो कोणत्याही माणसाशी जुळवून घेऊ शकतो. तसेच तो गावात एकटा आरामात फिरतो आणि आसपासच्या जंगलातही जातो. या वयातही तो स्वत:चे संरक्षण योग्य प्रकारे करुन घेऊ शकतो. त्याच्या 31 व्या जन्मदिनी त्याच्या मालकाने पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला 100 हून अधिक पाहुणे आले होते. इतक्या वयाचा होऊनही या कुत्र्याची प्रकृती उत्तम आहे. त्याला कोणताही आजार नाही. तरीही त्याची जनावरांच्या डॉक्टरांकडून नेहमी तपासणी केली जाते. तथापि, आता त्याची दृष्टी काहीशी कमी होऊ लागल्याचे लक्षात आले आहे.









