कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचे वक्तव्य : ट्रम्प यांच्या शुल्कास्त्रामुळे संतप्त
वृत्तसंस्था/ ओटावा
अमेरिकेसोबत आता जुने संबंध संपुष्टात आले आहेत. अमेरिकेसोबत दृढ आर्थिक आणि सुरक्षा संबंधांचे युग संपुष्टात आल्याची घोषणा कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी केली आहे. अमेरिकेकडून कॅनडावर आयातशुल्क लादण्यात आल्याने मार्क कार्नी नाराज आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्काच्या घोषणांमुळे अमेरिकेचे सहकारी देश अत्यंत नाराज झाले आहेत. युरोपपासून आशियातील अनेक देशांनी अमेरिकेच्या या निर्णयाच्या विरोधात आवाज उठविला आहे. अनेक देशांनी अमेरिकेच्या आयात शुल्काच्या विरोधात पाऊल उचलण्याचा इशाराही दिला आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क धोरणाने कॅनडा आणि अमेरिकेतील संबंध स्थायी स्वरुपात बदलले आहेत. आमच्या अर्थव्यवस्थांचे परस्परांसोबत मिलन, कठोर सुरक्षा आणि सैन्य सहकार्यावर आधारित अमेरिकेसोबत आमचे जुने संबंध आता संपले आहेत. भविष्यातही व्यापार करार देखील पूर्वीसारखी स्थिती निर्माण करू शकणार नसल्याचे कार्नी यांनी म्हटले आहे.
अमेरिका आता आयात होणाऱ्या कार्स आणि कार्सच्या सुट्या भागांवर 25 टक्के आयातशुल्क 3 एप्रिलपासून लागू करणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक पुरवठासाखळीवर गंभीर प्रभाव पडणार आहे. तर कार्सच्या किमती वाढणार असल्याने जागतिक व्यापारात तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेने मागील वर्षी सुमारे 475 अब्ज डॉलर्स मूल्याच्या कार्सची आयात केली होती. अमेरिकेत कार विकणाऱ्या देशांमध्ये मेक्सिको, जपान, दक्षिण कोरिया, कॅनडा आणि जर्मनीचा समावेश आहे. हे सर्व देश अमेरिकेचे सहकारी असून ट्रम्प यांच्या शुल्कामुळे या सर्व देशांच्या कारउत्पादकांवर प्रतिकूल प्रभाव पडणार आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्या शुल्क धोरणाला चुकीचे आणि वर्तमान व्यापार करारांचे उल्लंघन करणारे ठरविले आहे. याचबरोबर त्यांनी अमेरिकेच्या शुल्कधोरणाच्या प्रत्युत्तरादाखल कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे. ट्रम्प यांच्या शुल्क धोरणाचा अमेरिकेत कमाल प्रभाव आणि कॅनडात किमान प्रभाव पडणार असल्याचा दावा कार्नी यांनी केला आहे.









