विटी-दांडू…प्रसिद्ध भारतीय पारंपरिक खेळांपैकी एक अन् एकेकाळी प्रत्येक मुलाच्या आवडीचा क्रीडाप्रकार…विटी नावाच्या लहान लाकडी तुकड्याला लांब दांडूनं हाणण्याचा खेळ भारतात सुमारे 5000 वर्षांपासून लोकप्रिय आहे…मौर्य साम्राज्यानं अंदाजे 2500 वर्षांपूर्वी सिंध, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, कंबोडिया, इटली, तुर्कीचा काही भाग आणि दक्षिण आफ्रिकेपर्यंत त्याला पोहोचविलं असं मानलं जातं…
- या खेळातील विटी ही फार तर 4 ते 6 इंच लांब आणि 1 ते 1.5 इंच व्यासाची असते. दोन्ही बाजूंनी ती टोकदार बनविलेली असते. तर दांडू 1.5 ते 2 फूट लांब व 1 इंच व्यासाचा असतो. विटीवर प्रहार करून ती हवेत उसळवायची आणि मग दांडूच्या साहाय्यानंच दूरवर फटकावायची अशी ही प्रक्रिया…सर्वांत मोठं आव्हान हे उसळलेल्या विटीला फटकावण्याचं…
- हा खेळ अगदी रस्त्यावर किंवा सुमारे 60 मीटर लांब आणि 40 मीटर ऊंदीच्या कोणत्याही मोकळ्या मैदानात खेळला जाऊ शकतो. अखिल भारतीय विटी-दांडू महासंघानुसार अधिकृत सामन्यांसाठी मैदानाचं परिमाण हे सीमांसह 40 मीटर ते 100 मीटर लांबीपर्यंत राहतं…
- दोन संघांमध्ये हा खेळ खेळला जातो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम विटी फटकावायची की प्रथम क्षेत्ररक्षण करायचं हे ठरवितो…यासाठी मैदानात 2 मीटर त्रिज्येचं एक वर्तुळ काढलं जातं आणि त्याच्या मध्यभागी सुमारे 3 इंच लांब नि 1 इंच ऊंद अशा प्रकारे आयताकृती पद्धतीनं थोडंसं खोदलं जातं. त्यावर विटी ठेवून ‘स्ट्रायकर’ ती उसळवितो आणि फटकावतो…
- वर्तुळापासून 10 मीटर अंतरावर एक रेषा काढली जाते, ज्याला पहिली सीमारेषा म्हणतात…क्षेत्ररक्षण करणारा संघ हवेत उडालेली विटी पकडण्याच्या बेतानं मैदानात पसरलेला असतो. ‘स्ट्रायकर’ विटीला हवेत शक्य तितक्या दूर आणि कोणताही क्षेत्ररक्षक पकडू शकणार नाही अशा पद्धतीनं फटकावण्याचा प्रयत्न करतो. यावेळी विटी पहिल्या सीमारेषेच्या पलीकडे जाणं आवश्यक. तसं न झाल्यास खेळाडूला पुढं आणखी विटी फटकावायला मिळत नाही…
- जर खेळाडूनं विटी फटकावली आणि जमिनीवर स्पर्श करण्यापूर्वी कोणत्याही क्षेत्ररक्षकानं ती पकडली, तर ‘स्ट्रायकर’ बाद होतो अन् पुढचा खेळाडू ‘स्ट्रायकर’ म्हणून येतो…जर ‘स्ट्रायकर’नं विटी फेकली अन् कोणताही क्षेत्ररक्षक तो पकडू शकला नाही, तर एक क्षेत्ररक्षक ती उचलतो आणि जिथं ‘स्ट्रायकर’नं दांडू ठेवलेला असतो त्या वर्तुळाला लक्ष्य बनवून परत फेकतो. जर विटीनं दांडूला स्पर्श केला, तर देखील ‘स्ट्रायकर’ बाद होतो…
- जर विटी दांडूला स्पर्श करू शकली नाही, तर ‘स्ट्रायकर’ नव्यानं विटी फटकावण्यास मोकळा होतो…त्याला विटी फटकावण्यासाठी सलग तीन संधी मिळतात…तीन वेळा फटकावल्यानंतर वर्तुळापासून विटी जिथं जाऊन पडलेली असेल त्या बिंदूपर्यंतचं अंतर दांडू वापरून मोजलं जातं…‘स्ट्रायकर’चे गुण विटी किती अंतरावर जाऊन पडते यावर अवलंबून असतात. दांडूची लांबी ‘स्ट्रायकर’ला एक गुण देऊन जाते…हे गुण नोंदवून झाले की, पुढचा खेळाडू ‘स्ट्रायकर’ म्हणून उतरतो…
- ‘स्ट्रायकर’ संघाचे सर्व खेळाडू बाद होईपर्यंत या प्रक्रियेची पुनरावृत्ती होते. त्यानंतर भूमिकांची अदलाबदल होते अन् ‘स्ट्रायकर’ संघ क्षेत्ररक्षण करू लागतो. दुसऱ्या डावात प्रतिस्पर्ध्यांच्या गुणांना मागं टाकण्याचं लक्ष्य समोर ठेवलं जातं…सर्वाधिक गुणसंख्या नोंदविणारा संघ सामना जिंकतो…
– राजू प्रभू









