थ्रोबॉल… एक रोमांचक आणि खेळाडूंचा एकमेकांशी संपर्क न येणारा असा खेळ. प्रत्येकी सात खेळाडूंच्या दोन संघांद्वारे एका आयताकृती कोर्टवर तो खेळला जातो, ज्याच्या मध्यभागी जाळं असतं…या खेळाचं मूळ व्हॉलीबॉलसारखंच असलं अन् जरी वरवर पाहता हे दोन्ही खेळ जरी सारखेच दिसत असले, तरी त्यात काही मूलभूत फरक आहेत…
- व्हॉलीबॉलप्रमाणं थ्रोबॉलचं कोर्ट दोन भागांमध्ये विभागलेलं असतं, परंतु ते व्हॉलीबॉल कोर्टपेक्षा मोठं म्हणजे 12.2 मीटर×18.3 मीटर इतकं असतं अन् जाळं 2.2 मीटर उंचीवर बांधलं जातं…दुसरा मूलभूत फरक हा की, थ्रोबॉलमध्ये ‘व्हॉलिंग’ नसतं. नावाप्रमाणंच चेंडू विरोधी क्षेत्रात फेकला जातो, त्या संघानं तो पकडून व लगेच परत फेकून प्रतिस्पर्ध्यांना गुण मिळविण्यापासून रोखायचे असते.
- हा गतिमान खेळ असून तो पहिल्या मिनिटापासूनच अॅक्शननं भरलेला असतो. म्हणूनच एक खेळ म्हणून तो जगभरात लोकप्रिय झालाय…थ्रोबॉल जगभरात खेळला जात असला, तरी तो भारतीय उपखंडात सर्वांत जास्त लोकप्रिय आणि परदेशात त्याची लोकप्रियता दाखविणारी जी केंद्रं आहेत तिथंही मोठ्या प्रमाणात भारतीय समुदाय आढळतात…
- असं मानलं जातं की, या खेळाचा उगम इंग्लंडमध्ये महिलांकडून खेळल्या जाणाऱ्या लोकप्रिय खेळातून झाला आणि नंतर ‘वायएमसीए’द्वारे भारतात 40 च्या दशकात तो चेन्नईत आणला गेला…थ्रोबॉलचे पहिले नियम 1955 मध्ये ‘वायएमसीए’च्या हॅरी क्रो बक यांनी लिहिले आणि पुढील काही वर्षांत या खेळाची लोकप्रियता हळूहळू वाढत गेली…1985 साली ‘थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’ची स्थापना झाली…
- थ्रोबॉल खेळात प्रत्येक संघाचा उद्देश प्रत्येक सेटमध्ये प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त गुण मिळवून त्यांना हरविण्याचा असतो. सामने तीन सेट्सचे खेळविणं आवश्यक. जो संघ 15 गुण आधी नोंदवतो तो सेट जिंकतो आणि दोन सेट जिंकल्यावर सामना खात्यात जमा होतो…खेळाडू अशा पद्धतीनं चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतात की, दुसरा संघ तो पकडून परत फेकण्यात अपयशी ठरावेत आणि त्यांना गुण प्राप्त व्हावा…
- थ्रोबॉलमध्ये वापरला जाणारा चेंडू व्हॉलीबॉलसारखाच, पण थोडा मोठा असतो…यात सर्व्ह करतानाच गुण मिळवता येतात. ‘सर्व्हिस’ ‘बॅक लाईन’च्या मागून केली जाते…
- जर एखादा संघ सर्व्ह किंवा थ्रो परतविण्यात अयशस्वी ठरून चेंडू जाळ्यावर मारला गेला, तर गुण गमवावे लागतात…चेंडू फेकताना तो खांद्याच्या किंवा त्याहून वरच्या पातळीवरून फेकायचा असतो…थ्रोबॉलमध्ये पासला परवानगी नाही. एखाद्या खेळाडूनं चेंडू मिळताच लगेच तो जाळ्यावरून फेकायचा असतो…एकाचवेळी दोन खेळाडूंना चेंडू पकडता येत नाही…
– राजू प्रभू









