टेनिकॉइट…या खेळाला ‘रिंग टेनिस’ म्हणूनही ओळखलं जातं. रबर रिंगनं खेळला जाणारा हा खेळ म्हणजे आपल्याकडील शाळांमध्ये लोकप्रिय असलेला हा प्रकार…यामध्ये रिंग पकडून प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टमध्ये फेकणं हा एकमेव उद्देश असतो. या खेळाचा शोध जर्मनीमध्ये लागला असं मानलं जातं. तो एकेरी आणि दुहेरी स्वरूपातही खेळला जाऊ शकतो. हा क्रीडाप्रकार जर्मनी, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि काही दक्षिण आशियाई देशांमध्ये, विशेषत: भारतात भरपूर लोकप्रिय आहे…
- टेनिकॉइट इनडोअर आणि बाहेर तसंच मातीच्या किंवा सिमेंटच्या पृष्ठभागावरही खेळता येतो. याकरिता वापरलं जाणारं आयताकृती कोर्ट एकेरीसाठी 12.20 मीटर लांब आणि 4.60 मीटर ऊंद असतं. कोर्टला 6.10 मीटर लांबीच्या दोन समान अर्ध्या भागांमध्ये विभागणाऱ्या रेषेला ‘सेंटर लाइन’ म्हटलं जातं. दुहेरीसाठीचं कोर्ट हेही 12.20 मीटरच लांब, पण 5.50 मीटर ऊंद असतं…
- मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंना 0.9 मीटर अंतरावर काढलेल्या एका समांतर रेषेला ‘डेड लाईन’ असं म्हणतात. ‘डेड लाईन’ आणि मध्यरेषेच्या दरम्यानच्या क्षेत्राला ‘डेड कोर्ट’ म्हटलं जातं अन् त्यात रिंग पडल्यास गुण मिळत नाही…
- मध्यभागी बांधलं जाणारं जाळं 1.8 मीटर उंचीवर बांधलं जातं. त्याच्यावरून रिंग फेकायचं असतं…या खेळात वापरलं जाणारं रिंग हे जागतिक टेनिकॉइट महासंघानुसार 190 ते 220 ग्रॅम वजनाचं असायला हवं…
- प्रत्येक खेळ सर्व्हनं सुरू होतो. सर्व्ह करताना रिंग विरोधी बाजूला तिरप्या दिशेनं असलेल्या जागेत फेकावं लागतं…प्रत्येक खेळाडू किंवा संघ आळीपाळीनं सलग पाच वेळा सर्व्हिस करतो, मग गुण कोणी का मिळवेना…रिंग पकडून ती प्रतिस्पर्ध्यांकडे फेकण्याचं सत्र जोपर्यंत एक खेळाडू किंवा संघ रिंग पकडण्यात अथवा फेकण्यात अयशस्वी ठरत नाही तोपर्यंत चालतं…
- पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी नि दुहेरी तसंच मिश्र दुहेरी गटात त्याचे सामने खेळविले जातात…सांघिक स्पर्धा टेनिसमधील डेव्हिस कपच्या धर्तीवर खेळविली जाते म्हणजे दोन एकेरी, एक दुहेरी आणि दोन परतीचे एकेरी सामने. त्यामुळं सांघिक स्पर्धेसाठीच्या प्रत्येक संघात पाच खेळाडू असतात,
- प्रतिस्पर्धी खेळाडू रिंग पकडण्यात किंवा फेकण्यात अयशस्वी ठरल्यास वा ‘फाऊल’ झाल्यास गुण प्राप्त होतो…खेळाडू फक्त एका हातानं रिंग पकडू किंवा फेकू शकतो हे महत्त्वाचं…
- एक सामना हा तीन सेट्सचा असतो आणि दोन सेट जिंकणारा संघ सामना जिंकतो. प्रत्येक सेट 21 गुणांपर्यंत चालतो आणि जो खेळाडू वा संघ दोन गुणांची आघाडी ठेवून प्रथम 21 गुण नोंदवितो तो सेट खिशात घालतो. समजा ‘ड्यूस’ म्हणजे प्रत्येकी 20 गुण अशी बरोबरी निर्माण झाली, तर जो संघ वा खेळाडू 22 वा गुण प्रथम मिळवतो तो विजेता ठरतो…
- सामन्याचा नियमित कालावधी 20 मिनिटं असतो आणि तो प्रत्येकी 10 मिनिटांच्या दोन सत्रांमध्ये विभागलेला असतो…जर स्पर्धा बाद पद्धतीनं खेळली गेली आणि सामना अनिर्णित राहिला, तर खेळ अतिरिक्त 10 मिनिटं चालतो आणि तो प्रत्येकी पाच मिनिटांच्या दोन सत्रांमध्ये विभागला जातो. जर या अतिरिक्त वेळेतही कोंडी फुटली नाही, तर सामना दुसऱ्या आणि शेवटच्या अतिरिक्त वेळेत खेळविला जातो. त्याला वेळेची मर्यादा नसते. त्यात खेळाडू किंवा संघानं प्रतिस्पर्ध्यांवर दोन गुणांची आघाडी मिळविल्यानंतर सामना संपतो…
– राजू प्रभू









