फ्रीस्टाइल बुद्धिबळ…या खेळातला असा एक प्रकार जो 1996 मध्ये दिग्गज बुद्धिबळपटू बॉबी फिशरनी लोकप्रिय केला. त्याचं स्वरुप बुद्धिबळाची पारंपरिक वाट मोडणारं अन् त्याला वेगळं वळण देणारं…
- नेहमीचा बुद्धिबळ खेळ आणि हा प्रकार यातील नेमका फरक सांगायचा झाल्यास पारंपरिक स्वरुपात मागच्या रांगेतील सेंगाट्यांचं स्थान निश्चित असतं. उदाहरणार्थ हत्ती दोन्ही टोकांच्या कोपऱ्यांवर उभे असतात. त्याच्या शेजारच्या चौकटीत घोडा आणि नंतर उंट. मग राणी आणि राजा…
- परंतु फ्रीस्टाइल बुद्धिबळात खेळाच्या सुऊवातीला या सोंगाट्यांना हवं तसं मांडलं जातं. मात्र या सोंगाट्यांसमोरील आठ प्यादी मात्र नेहमीप्रमाणं पुढील रांगेत उभी असतात. खेळाडूंमधील सर्जनशीलता वाढविण्यासाठी हा बदल…
- यामुळं प्रत्येक सामन्यातील सुरुवात ही नाविन्यपूर्ण व वेगळ्या पद्धतीची असते. यामुळं ‘ओपनिंग’विषयक सारे साचेबद्ध डावपेच मोडीत निघतात. फिशर नि मॅग्नस कार्लसनसारख्या खेळाडूंच्या मते, जुन्या सिद्धांतांमुळं बुद्धिबळ खूप सैद्धांतिक आणि पुस्तकी स्वरुपाचा बनतो…
- खेळाडूंना त्यांच्या संघानं केलेल्या तयारीवर आधारित चालींची पहिली मालिका खेळण्याची सोय मिळण्याऐवजी पहिल्या चालीपासूनच अज्ञात प्रदेशात पाऊल ठेवण्यास भाग पाडलं जातं…याअंतर्गत मागच्या रांगेतील किरकोळ आणि महत्त्वपूर्ण सोंगाट्या हलवून पटावर एकूण 960 प्रकारच्या सुरुवातीच्या रचना मांडता येतात…
- या सोंगाट्यांची रचना जरी कशीही ठेवण्यात येत असली, तरी खेळातील त्यांची वाटचाल ठरल्याप्रमाणं होते. म्हणजे हत्ती सरळ रेषेत, तर उंट तिरपे चालतात आणि घोडा सोंगाट्यांवरून उडी मारून जाण्याची क्षमता राखतो…
- गेल्या काही वर्षांत खेळाडूंच्या बुद्धीचा कस पाहणारा हा फ्रीस्टाइल बुद्धिबळ विविध नावांनी लोकप्रिय झालाय. त्यात ‘फिशर रँडम चेस’, ‘चेस 9 एलएक्स’ आणि ‘चेस 960’ यांचा समावेश होतो…
- ‘फ्रीस्टाइल चेस ग्रँड स्लॅम टूर’ ही पाच बुद्धिबळ स्पर्धांची मालिका, जी जर्मनीच्या उद्योजक जॅन हेन्रिक बुएटनरनं सुरू केलीय. ती जर्मनीसह पॅरिस, न्यूयॉर्क, नवी दिल्ली व केपटाऊनसारख्या शहरांमध्ये आयोजित केली जाईल, असं सांगण्यात आलंय. यापैकी पहिली स्पर्धा सध्या जर्मनीतील हॅम्बर्ग शहरात चाललीय…
- या फ्रीस्टाइल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम टूर स्पर्धांमध्ये वापरला जाणारा ‘टाइम कंट्रोल’ हा ‘रॅपिड’ किंवा ‘ब्लिट्झ’प्रमाणं नव्हे, तर ‘क्लासिकल बुद्धिबळसारखा. म्हणजे पहिल्या 40 चालींसाठी 90 मिनिटं, त्यानंतर प्रत्येक चालीमागं अतिरिक्त 30 सेकंदाच्या व्यतिरिक्त उर्वरित खेळासाठी 30 मिनिटं…
- 1996 साली पहिली ‘फिशर रँडम बुद्धिबळ स्पर्धा’ तत्कालिन युगोस्लाव्हियातील वोजवोडिना इथं आयोजित करण्यात आली होती आणि त्यात पीटर लेकोनं बाजी मारली होती…
- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघानं (फिडे) बुद्धिबळाच्या नियमांच्या यादीत ‘चेस 960’ची भर घातली ती 2008 साली…महासंघानं अधिकृतपणे मंजूर केलेली पहिली जागतिक स्पर्धा ‘फिडे वर्ल्ड फिशर रँडम चेस चॅम्पियनशिप 2019’नं या प्रकाराचं महत्त्व वाढविण्यास मोलाचा हातभार लावला. ती स्पर्धा फिलिपीन्सचा अमेरिकेत स्थायिक झालेला ग्रँडमास्टर वेस्ली सो यानं जिंकली, तर 2022 मध्ये अमेरिकेचा हिकारू नाकामुरा नवीन विजेता बनला…
– राजू प्रभू









