डॉजबॉल…दोन संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या खेळात एकमेकांवर चेंडू फेकला जातो अन् खेळाडू प्रतिस्पर्ध्यांनी फेकलेले चेंडू चुकविण्याचा प्रयत्न करतात…हा खेळ बहुतेकदा बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, कुंपण घातलेल्या जागेवर किंवा फुटबॉल मैदानावर देखील खेळला जातो…स्पेनमध्ये त्याला ‘डॅचबॉल’, तर भारतात ‘सेकन-ताडी’, ‘गेंद ताडी’ व ‘मारम पिट्टी’ असं म्हणतात…
- डॉजबॉलचा उगम खरं तर आफ्रिकेत झाला. त्यावेळी एका जमातीतील दोन विरोधी गटातील सदस्य एकमेकांवर मोठे दगड फेकायचे…18 व्या शतकात आफ्रिकेत काम करणारे मिशनरी डॉ. जेम्स कार्लाइल यांनी तो पाहिला आणि इंग्लंडमध्ये त्याला रुजविताना विद्यार्थ्यांना दगडाऐवजी मऊ रबर बॉल देऊन या खेळाची सुरक्षित आणि अधिक चांगली आवृत्ती तयार केली…
- फिलिप फर्ग्युसन यांनी इंग्लंडमध्ये हा खेळ पाहिल्यावर तो अधिक चांगला करण्यासाठी काही बदल सूचविले. अमेरिकेत डॉजबॉल आणण्याचं श्रेय फर्ग्युसन यांनाच देण्यात येतं…अमेरिकेत परतल्यानंतर त्यांनी या खेळाचे अधिकृत नियम तयार केले आणि संपूर्ण देशात तो लोकप्रिय करण्यास मदत केली…
- डॉजबॉल कोर्ट 18 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद म्हणजे व्हॉलीबॉल कोर्टासारखं असतं…एक सामना 40 मिनिंट चालतो व 20 मिनिटांच्या दोन सत्रांमध्ये विभागलेला असतो…प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात अन् मिश्र स्पर्धेत प्रत्येक संघात दोन महिला खेळाडूंचा समावेश राहतो…
- या खेळात वापरल्या जाणाऱ्या डॉजबॉलची म्हणजे चेंडूंची संख्या वेगवेगळी असते, परंतु सहसा ती तीन ते दहादरम्यान राहते. खेळाच्या सुऊवातीला चेंडू मैदानाच्या मध्यभागी रांगेत ठेवले जातात. त्यानंतर खेळाडू मध्यभागी धावून डॉजबॉल पकडतात आणि त्यांच्या संघातील इतर खेळाडूंकडे देतात. यानंतर ते चेंडू विरोधी संघाच्या दिशेनं फेकू शकतात…हे चेंडू गोळा करतेवेळी मध्यरेषेला स्पर्श केला वा ती ओलांडली, तर चालतं. त्यानंतर मात्र असं करता येत नाही…
- जर एखाद्या खेळाडूला फेकलेला चेंडू लागला आणि कोणीही तो पकडला नाही, तर तो खेळाडू बाहेर पडतो. त्या खेळाडूला संघाच्या ‘बेंच एरियामध्ये जावं लागतं. जर एखाद्या खेळाडूनं प्रतिस्पर्ध्यानं फेकलेला चेंडू पकडला, तर चेंडू फेकणारा खेळाडू बाहेर पडतो…
- चेंडू जमिनीवर किंवा दुसऱ्या चेंडूवर आदळला, तर तो ‘डेड बॉल’ मानला जातो…जर खेळाडूवर आदळण्यापूर्वी चेंडू जमिनीवर आदळला, तर तो खेळाडू सुरक्षित राहतो…खेळाडू हातातील चेंडूचा वापर करून प्रतिस्पर्ध्यांनी हाणलेला चेंडू अडवून तो प्रयत्न निष्फळ ठरवू शकतात. मात्र यावेळी खेळाडूचे कपडे किंवा त्याच्या शरीराचा त्याला स्पर्श होता कामा नये…
- पण जर असा अडविलेला चेंडू संघातील दुसऱ्या खेळाडूवर आदळून जमिनीवर पडला, तर तो सहकारी बाद होतो. त्याचप्रमाणं चेंडू अडविताना हातातील चेंडूवरील नियंत्रण जाऊन तो खाली जमिनीवर पडला, तर बाद व्हावं लागतं…खेळाडूंनी खेळ सुरू झाल्यानंतर मध्यरेषेला किंवा बाह्य सीमारेषेला स्पर्श केला, तर ते बाद होतात…
- यात संघाचा उद्देश अधिकाधिक सेट जिंकण्याचा असतो. एक सेट जिंकण्यासाठी विरोधी संघातील खेळाडूंवर चेंडू हाणून अथवा प्रतिस्पर्ध्यांनी फेकलेले चेंडू पकडून किंवा चेंडू फेकून त्यांना कोर्टच्या सीमेबाहेर जाण्यास भाग पाडून सर्व विरोधी खेळाडूंना बाद करावं लागतं…
– राजू प्रभू









