- ब्रिजची पाळंमुळं शोधायला गेल्यास ती 16 व्या शतकातील इंग्लंडपर्यंत पोहोचतात. त्यावेळी तो सामान्य वर्गात खेळला जात असे. पण पुढं या खेळाची लोकप्रियता इतकी वाढत गेली की, त्यानं उच्चभ्रूंनाही आकर्षित केलं…
- 1932 मध्ये ‘आंतरराष्ट्रीय ब्रिज लीग’ची स्थापना झाली अन् त्याची जागा पुढं 1958 साली ओस्लो इथं घेतली ती ‘वर्ल्ड ब्रिज फेडरेशन’नं. आंतरराष्ट्रीय ब्रिज स्पर्धांवर देखरेख ठेवणं, सहभागी होणाऱ्या विविध राष्ट्रांमध्ये समन्वय साधणं अन् स्पर्धा नियम तयार करणं हे काम केलं जातं ते याच महासंघाकडून…
- ब्रिज हा जोडीनं खेळण्याचा प्रकार अन् त्यात जोडीदार एकमेकांच्या विऊद्ध म्हणजे एकाच टेबलावर उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम या पद्धतीनं बसतात…या गेममध्ये अनेक ‘डील’ (डाव) असतात ज्यांना ‘हँड्स’ किंवा ‘बोर्ड’ असंही म्हटलं जातं अन् 52 पत्त्यांचा नेहमीचा ‘पॅक’ त्यासाठी वापरला जातो…
- ‘बिडिंग’ (बोली लावणं) अन् प्रत्यक्ष खेळणं हे या खेळाचे दोन टप्पे. खेळाडूंची जोडी ‘डिक्लरर’ कोण असेल आणि निवडलेल्या ‘ट्रंप सूट’नं किंवा ‘ट्रंप’शिवाय किती डाव जिंकले जातील हे सांगण्याकरिता ‘बिडिंग’चा वापर करतात. दुसऱ्या टप्प्यात दोन्ही संघ शक्य तितके विजय मिळविण्याचा प्रयत्न करतात. अखेरीस जास्तीत जास्त गुण खात्यात जमा करणाऱ्या संघाची सरशी होते…
- ‘ब्रिज गेम’ जिंकण्यासाठी सहसा 100 वा त्याहून अधिक गुण बनवावे लागतात…या प्रकाराचा सामना तीन गेम्सचा असतो. त्यापैकी दोन गेम जिंकणारा संघ सामना आपल्या खात्यावर जमा करतो…
- सुरुवातीला चारपैकी एक खेळाडू ‘डिलर’ बनून पत्ते पिसून प्रत्येकाला 13 याप्रमाणं वाटतो…खेळाला सुरुवात झाल्यानंतर एकेक खेळाडू एकेक पत्ता टाकतो. ‘डिलर’च्या डाव्या बाजूला बसलेल्या खेळाडूपासून सुरुवात होते. ‘इस्पिक’, ‘बदाम’, ‘चौकट’ व ‘किल्वर’ यापैकी ज्या प्रकारचा पत्ता आधी टाकला जाईल त्याच गटाचा पत्ता सहसा इतरांनी टाकायचा असतो. तसा तो नसल्यास ‘ट्रंप’ वा अन्य प्रकारचं कार्ड टाकता येतं. यापैकी सर्वाधिक मूल्याचं कार्ड ज्याचं त्याच्या नावावर तो डाव म्हणजे ‘हँड’ जमा होतो अथवा ‘ट्रंप’ कार्ड टाकून सरशी साध्य करता येते…
- ‘ब्रिज’मध्ये किमान सहा डाव जिंकायला हवेत असं मानलं जातं. त्यामुळं सातव्या डावापासून गुण मिळण्यास सुरुवात होते…‘बिडिंग’मध्ये आपली जोडी किती डाव जिंकणार हे सांगताना त्यात हे सहा डाव जमेस धरले जात नाहीत. उदाहरणार्थ एखाद्याला 10 डाव जिंकणार असं वाटलं, तर त्यातून सहा वजा करून चार डाव जिंकणार असं तो खेळाडू सांगतो…
- आपल्याकडील चांगले पत्ते किती आहेत त्याचा विचार करून किती डाव जिंकणार त्याचं अनुमान लावलं जातं…जर पत्ते अगदीच खराब असतील नि ‘बिंडिंग’ करायचं नसेल, तर तो ‘पास’ म्हणू शकतो…अनुमानापेक्षा जास्त डाव जिंकले, तर त्याचे अतिरिक्त गुण मिळतात…
- ‘इस्पिक’, ‘बदाम’, ‘चौकट’ व ‘किल्वर’ यापैकी कुठला गट आपला ‘ट्रंप’ असेल हे पदरी कुठल्या प्रकारचे पत्ते जास्त दमदार आहेत हे पाहून घोषित केलं जातं. मात्र एखाद्याकडे संमिश्र पत्ते असतील, तर तो ‘नो ट्रंप’ जाहीर करू शकतो…
- 2018 मध्ये इंडोनेशियातील जकार्ता इथं झालेल्या स्पर्धेतून ब्रिजनं आशियाई खेळांत पाऊल ठेवलं…चीनमधील हांगझाऊ इथं झालेल्या मागील आशियाई खेळांतही त्याचा समावेश होता. त्यात भारताच्या पुरुषांच्या संघानं रौप्यपदकाची कमाई केली होती…
– राजू प्रभू









