बीच हँडबॉल…हा क्रीडाप्रकार सर्वांत अधी बहरला तो इटलीच्या समुद्रकिनाऱ्यांवर. त्यामुळं त्या देशातील अनेक हँडबॉल खेळाडूंना वाळूत खेळण्याकडे वळण्याचा मोह आवरला नाही…80 च्या दशकाच्या उत्तरार्धात इटालियन प्रशिक्षक सिमोनेता मोंतॅगनी यांनी ‘बीच हँडबॉल’ विकसित करण्यास सुऊवात केली. या खेळाची लोकप्रियता वाढू लागल्यानंतर प्रशिक्षक लुसियानो बार्तोलिनी यांना 1990 मध्ये खेळाच्या नियमांचा पहिला संच तयार करण्यास सांगितलं गेलं…
- 2000 मध्ये ‘बीच हँडबॉल’ हा अधिकृतरीत्या युरोपियन हँडबॉल महासंघाचा खेळ बनला आणि त्याच वर्षी इटलीच्या गेटा येथे सदर महासंघाची पहिली बीच हँडबॉल युरोपियन स्पर्धा आयोजित करण्यात आली…
- आंतरराष्ट्रीय हँडबॉल महासंघाच्या प्रतिनिधींच्या सहभागासह हा खेळ आणखी विकसित होऊन जागतिक स्तरावर त्याचा प्रसार होऊ लागला…2004 साली पहिली बीच हँडबॉल जागतिक स्पर्धा इजिप्तमध्ये आयोजित करण्यात आली, तर 2017 साली मॉरिशसमध्ये आंतरराष्ट्रीय हँडबॉल महासंघातर्फे पहिली 17 वर्षांखालील ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’ घेण्यात आली…
- ‘बीच हँडबॉल’ हा जरी इनडोअर हँडबॉलपासून निर्माण झालेला असला, तरी इथं पायाखालची वाळू खेळाची बरीच दिशा ठरवते. या वाळूमुळं अनेकदा गोलरक्षकाला चकविण्याच्या इच्छेपोटी खेळाडूंकडून हवेत झेपावत नेत्रदीपकरीत्या चेंडू फेकले जातात…या प्रकाराच्या मैदानात 40 सेंटीमीटर इतका जाड वाळूचा थर असावा लागतो…
- इनडोअर हँडबॉलच्या विपरित बीच हँडबॉल हा खेळाडूंचा एकमेकांशी शारीरिक संपर्क घडू देत नाही…यात हातांनी चेंडू पास करून शेवटी गोल करायचा असतो अन् 3 सेकंदांपर्यंत चेंडू धरून ठेवता येतो…
- बीच हँडबॉलचे सामने विलक्षण जलद गतीनं खेळले जातात, ज्यामध्ये प्रत्येकी 10 मिनिटांचे दोन सेट्स असतात. दोन सेटदरम्यान पाच मिनिटांचं मध्यांतर…प्रत्येक सेटच्या विजेत्याला एक गुण दिला जातो. एखाद्या सेटमध्ये गुणसंख्या समान झालेली असेल, तर कोंडी फोडण्यासाठी ‘गोल्डन गोल’चा अवलंब केला जातो. म्हणजे सर्वप्रथम गोल नोंदविणाऱ्या संघाला विजयश्री मिळते…
- सेट्स जिंकण्याच्या बाबतीत बरोबरी झाल्यास सामन्याचा निकाल शूटआउटद्वारे निश्चित केला जातो. यात एकास एक या पद्धतीने खेळाडू विरोधी संघाच्या गोलरक्षकाला चकविण्याचा प्रयत्न करतो. शूटआउटमध्ये प्रत्येक संघाला पाच प्रयत्न मिळतात. जर तरीही गुण बरोबरीत राहिले, तर सडन डेथद्वारे विजेता ठरविला जातो…
- बीच हँडबॉलमध्ये सहसा 10 जणांच्या संघातील, तर ऑलिंपिक खेळांमध्ये नऊ जणांच्या संघातील एका वेळी चार खेळाडू मैदानावर उतरतात. त्यात तीन खेळाडू आणि एक गोलरक्षक…
- इनडोअर हँडबॉलप्रमाणे प्रतिस्पर्ध्यांच्या जाळीत चेंडू टाकल्यावर गोल नोंदविला जातो. या प्रकारात ‘इन-फ्लाइट गोल’सारखे नेत्रदीपक प्रकार पाहायला मिळतात…
- नियमित गोल एक गुण, तर ‘इन-फ्लाईट’ (हवेत झेपावून) वा ‘स्पिन शॉट गोल’ (हवेत गिरकी घेऊन) दोन गुण मिळवून जातो. गोलरक्षकानं केलेला किंवा पेनल्टी थ्रोवर केलेला गोल हा अतिरिक्त गुण म्हणजे दोन गुण बहाल करून जातो. त्याचप्रमाणं सहा मीटरांवरून केलेल्या यशस्वी थ्रोवर देखील दोन गुण मिळतात…
- हँडबॉलचा हा नवीन प्रकार 2018 च्या उन्हाळी युवा ऑलिंपिक खेळांमध्ये सर्वप्रथम झळकला. तिथं त्यानं जागा घेतली ती इनडोअर हँडबॉलची. मात्र अजून त्याला ऑलिम्पिक खेळांमध्ये प्रवेश मिळायचा बाकी आहे…
– राजू प्रभू









