आट्यापाट्या…भारतातील प्रमुख स्थानिक खेळांपैकी एक अन् विशेषत: ग्रामीण भागांमध्ये खूप लोकप्रिय असलेला क्रीडाप्रकार…अनादीकाळापासून खेळला जाणारा हा खेळ परिस्थितीनुसार वेगवेगळ्या नावांनी ओळखला गेलाय अन् सोयीस्कर नियमांसह खेळला गेलाय…तामिळनाडूमध्ये या खेळाचा जुन्या तमिळ साहित्यात ‘किलिथाटू’ या नावानं उल्लेख आढळतो…
- या खेळाला शिस्तबद्ध, व्यवस्थित पद्धतीनं आयोजित करण्याचा पहिला प्रयत्न केला तो पुण्यातील ‘डेक्कन जिमखान्या’नं. त्यांनी नियम तयार केले आणि सामने आयोजित केले…पुढील पाऊल बडोद्यातील हिंद विजय जिमखान्यानं उचललं. त्यांनी नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले अन् खेळाचा प्रचार करण्यासाठी तसंच लोकप्रियता वाढविण्यासाठी स्पर्धा आयोजित केल्या.
- परंतु या खेळाच्या विकासासाठी मुख्य प्रयत्न झाले ते अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाकडून…त्यांनी विभागीय स्पर्धा आयोजित केल्या, ज्यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक इत्यादी विविध राज्यांमधील मराठी भाषिक भागांतील संघ सहभागी झाले. या स्पर्धा 1948 मध्ये आयोजित करण्यात आल्या…
- 1982 मध्ये भारतात झालेल्या आशियाई खेळांच्या वेळी भारतीय आट्यापाट्या महासंघाची स्थापना झाली. त्याच वर्षी नागपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेनं या खेळाचं पुनऊज्जीवन घडविलं. 1996 पासून तामिळनाडू संघानं राष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेण्यास सुऊवात केली…
- भारतीय आट्यापाट्या महासंघानं तयार केलेल्या नियमांनुसार प्रत्येक लढत ही दोन डावांची असते नि प्रत्येक डाव सात मिनिटं चालतो. प्रत्येक संघात नऊ खेळाडू असतात. दोन डावांच्या मध्ये दोन मिनिटांचं मध्यांतर असतं. एक सामना तीन लढतींचा राहतो…
- चढाई करणाऱ्या संघातील खेळाडूला ओलांडलेल्या प्रत्येक ‘पाटी’मागं एक गुण मिळतो. दोन्ही संघ दोन डावांमध्ये आळीपाळीनं चढाई व बचावाची भूमिका बजावतात…आट्यापाट्यासाठी’च्या मैदानात 23 फूट 1 इंच लांब आणि 13 इंच ऊंद असे 9 पट्टे असतात, ज्यांना ‘पाटी’ म्हणून ओळखलं जातं. मध्यवर्ती लांब पट्ट्याला ‘सूर-पाटी’ म्हणून ओळखलं जातं आणि तो 89 फूट 1 इंच लांब, तर 13 इंच ऊंद राहतो…
- ‘सूर-पाटी’ 9 ‘पाटीं’पैकी प्रत्येकाला समान भागांमध्ये विभागते. खेळाच्या मैदानाभोवती 10 फूट मोकळी जागा असते. जे खेळाडू ‘पाटी’ ओलांडण्याचा प्रयत्न करतात तो चढाई करणारा संघ असतो, तर प्रतिस्पर्धी बचावपटू प्रत्येक ‘पाटी’वर समोरील ‘पाटी’कडे तोंड करून उभे राहतात अन् त्यांना अडविण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा स्पर्श झाल्यास चढाई करणारा खेळाडू बाद होतो…
– राजू प्रभू









