फॅब लिग चषक, सेव्हन ए साईड फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित अमोदराज स्पोर्ट्स क्लब पॅब पुरस्कृत चषक दुसऱ्या निमंत्रितांच्या सेव्हन ए साईडच्या फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून ओल्ड फाटाने भारत एफसीचा, साईराज वॉरियर्सने डिसायडर एफसीचा, राहुल के आर शेट्टीने सिग्नेचरचा तर टेन टेन एफसीने के आर शेट्टी किंगचा पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळवले. वडगाव येथील सीआर सेव्हन स्पोर्ट्स एरियाना टर्फ फुटबॉल मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ओल्ड फाटाज एफसीने भारत एफसीचा 2-0 असा पराभव केला. सामन्याच्या 14 व्या मिनिटाला सौरभच्या पासवर कौशिक पाटीलने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळून दिली. दुसऱ्या सत्रात 23 व्या मिनिटाला ओल्ड फाटाजच्या कौशिक पाटीलच्या पासवर सौरभने गोल करून 2-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात भारत एफसीला गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सामन्यात साईराज वॉरियर्सने डिसायडर एफसीचा 1-0 असा निसटता पराभव केला.
मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला साईराज संघातील महेशच्या पासवर बरीन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात डिसायडर एफसीने गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्या. तिसऱ्या सामन्यात राहुल केआर शेट्टी संघाने सिग्नेचर संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात अकराव्या मिनिटाला राहुल केआर शेट्टी संघातील फरानच्या पासवर नदीमने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळून दिली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले. शेवटी हा सामना राहुल के आर शेट्टीने जिंकला. चौथ्या सामन्यात टेनटेन एफसीने केआर शेट्टी किंग संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 16 व्या मिनिटाला टेनटेन एफसी संघातील निखिलच्या पासवर किरणने पहिला गोल केला. दुसऱ्या सत्रात 27 व्या मिनिटाला किरणच्या पासवर निखिलने सुरेख गोल करून 2-0 ची महत्त्वाची आघाडी टेनटेन एफसीला मिळवून दिली. या सामन्यात केआर शेट्टी किंगच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या नामी संधी दवडल्या.









