कोल्हापूर / सुधाकर काशीद :
मोटारींची हौस अनेकांना असते. कोणाची ही हौस पुरी होते. तर कोणाची होत नाही. पण म्हणून मोटारीची हौस कमी होत नाही. कोल्हापुरात असे काही हौशी मोटर मालक आहेत आणि त्यांनी जुन्या काळातील मोटारींची हौस नक्कीच जपली आहे.
राजेशाही मेबॅक मर्सिडीज, पेकॉर्ड, रोल्स, मेबॅक, पिअर्स, ब्युक, अॅरो, लँचेस्टर, मिनर्व्हा, बेंटली ऑस्टिन, वोक्सवॅगन अशा परदेशी बनावटीच्या मोटारी कोल्हापुरात ठराविक व्यक्तींकडे होत्या. आत्ताही आहेत. ते या मोटारी रोज फिरवत नाहीत. पण तरीही मोटारींचा दबदबा व आकर्षण आजही आहे. जवळून ही गाडी गेली तर थांबून या तिच्याकडे लोक माना वळवून पाहतात. इतके या मोटारींचे आजही आकर्षण आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी घेतलेली जर्मन बनावटीची मेबॅक ही मोटार जगातील दुर्मीळ मोटारींपैकी एक असून मेक टू ऑर्डर या पद्धतीची आहे. म्हणजे ग्राहक ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने कंपनीने बनवलेली ही मोटर आजही कोल्हापूरच्या दसरा सोहळ्यातील आकर्षणाचे केंद्र आहे.

नवीन राजवाड्यापासून दसरा चौकात सीमोलंघन सोहळ्यासाठी याच मोटारीतून श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजी, युवराज मालोजी येतात. जनतेच्या अभिवादनाचा स्वीकार करत याच मोटारीतून जुन्या राजवाड्याच्या सदरेवर जातात. या मोटारीबद्दल शहरवासीयांना आजही खूप कुतहूल आहे. 17.5 फूट लांब, 5.7 फूट रुंद असलेल्या या मोटारीस दोन स्टेपनी टायर व फिकट चॉकलेटी रंगाच्या काचा आहेत. स्टेरिंगवरच गिअर्स असून ते आपोआप पडतात. पुढील बाजूस भवानी व शिवाजी महाराजांची मूर्ती व हिज हायनेस महाराजा ऑफ कोल्हापूर अशी मुद्रा पट्टी आहे.
या मोटारीचे एव्हरेज खास राजेशाही थाटासारखेच आहे. एक लिटर पेट्रोलवर एक ते दीड किलोमीटर धावणारी ही मोटार धक्के विरहित तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. चालकाच्या मागे असलेल्या ट्रे वर पाण्याने भरलेला ग्लास ठेवला तरी मोटार चालू असताना त्यातील पाणी हलणार नाही, असे तंत्रज्ञान त्यासाठी वापरले आहे.
- पापा परदेशींची ऑस्टिन
कोल्हापुरात पापाची तिकटी हे नाव ज्यांच्यामुळे पडले त्या पापा परदेशी यांच्याकडे 1934 च्या इंग्लंड बनावटीची ऑस्टिन मोटार आहे. या मोटारीतून शिवप्रसाद परदेशी व त्यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास केला आहे. या मोटारीला मागे दुमडता येणारे गॅरेज असून त्यावर प्रवासाचे साहित्य बांधता येते. मोटारीचे छत ताडपत्रीचे असून ते हवे त्यावेळी मागे पुढे करता येते. पेट्रोलची टाकी 30 लिटरची असून अॅव्हरेज सात ते आठ किलोमीटर आहे.

उमा टॉकीज समोरच्या पेट्रोल पंपावरचे रवींद्र धरमतर यांच्याकडे जर्मन बनावटीची वोक्सवॅगन आहे. मागच्या बाजूस इंजिन असलेली ही मोटर दोन्ही बाजूने निमुळत्या आकाराची आहे. मोटारीला पुढे दोनच दरवाजे असून पुढच्या सीट थोड्या बाजूला करून मागच्या सीटवर जाता येते.
दत्तोबा काटकर मिस्त्राr यांची 1948 मॉडेलची सन बीम मोटार अजूनही नव्यासारखी आहे. 1953 साली त्यांनी अवघ्या दोन हजार रुपयात ही मोटार घेतली. मद्रासमधील एका लष्करी अधिकाऱ्यांची ही मोटार काटकर मिस्त्राRनी कोल्हापुरात आणली. मोटारीचा प्रत्येक पार्ट सुटा केला. जे पार्ट निकामी होते ते स्वत: तयार केले. आणि स्क्रॅप मोटारीला नवे रूप प्राप्त करून दिले. दत्तोबा काटकर यांचे वडील पिराजीराव काटकर म्हणजे शाहू महाराजांचे तांत्रिक सल्लागार. कोणतीही तांत्रिक पदवी नाही. पण निरीक्षण इतके सूक्ष्म की जे नजरेने टिपायचे ते स्वत: तयार करायचे. दत्तोबा काटकर यांचे चिरंजीव कर्नल जयवंतसिंग यांनी या मोटारीतून जम्मू ते कोल्हापूर असा प्रवास केला आहे. या मोटारीचे काटकर कुटुंबाला इतके कौतुक की, या कुटुंबातील प्रत्येक विवाह समारंभात या मोटारीतूनच वरात निघते. अशीच ऑस्टिन 10 ही मोटार व्हीनस टॉकीजचे मालक तय्यब अली बोहरी यांची आहे. ती त्यांनी 1938 साली कागलमधून घेतली.








