केपीटीसीएल-हेस्कॉमच्या व्यवस्थापकांनी लक्ष पुरविणे गरजेचे
बेळगाव : शिवबसवनगर येथील केपीटीसीएल आवारातील जुन्या क्वॉर्टर्स कोसळण्याच्या स्थितीत आहेत. जीर्ण झालेल्या भिंतींमुळे इमारती वापराविना पडून आहेत. परंतु या इमारतींवर छोटे वृक्ष वाढत असून यामुळे केव्हा कोसळतील याची शाश्वती नाही. जुन्या क्वॉर्टर्स शेजारीच नव्या क्वॉर्टर्स असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी केपीटीसीएल घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केपीटीसीएल व हेस्कॉम कर्मचाऱ्यांना निवासासाठी शिवबसवनगर येथे क्वॉर्टर्स बांधण्यात आल्या आहेत. येथे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय राहतात. जे कर्मचारी क्वॉर्टर्समध्ये राहत नाहीत त्यांना भत्ता दिला जातो. काही क्वॉर्टर्सच्या भिंती मोडकळीस आल्या आहेत. काही क्वॉर्टर्ससाठी दगडी बांधकाम करण्यात आले होते. त्यातील दगड आता निखळले असल्याने भिंती कधी कोसळतील याची शाश्वती नाही. जुन्या क्वॉर्टर्स शेजारीच नव्या क्वॉर्टर्सचे बांधकाम करण्यात आले आहे. जुन्या क्वॉर्टर्स खराब झाल्यामुळे खाली करण्यात आल्या आहेत. वापराविना पडून असणाऱ्या या क्वॉर्टर्समध्ये वड व पिंपळाची झाडे वाढली आहेत. मुळामुळे तीन मजली इमारत मोडकळीस आली आहे. इमारतीचे प्लास्टर कोसळत असून आतमधील विटादेखील बऱ्याचवेळा खाली पडतात. हेस्कॉम व केपीटीसीएल कर्मचाऱ्यांची लहान मुले याच परिसरात खेळत असतात. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी जुन्या क्वॉर्टर्स जमीनदोस्त कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
नव्या इमारती बांधल्यास कर्मचाऱ्यांची सोय होणार
राज्य सरकारकडून दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी निधी दिला जातो. या निधीचा वापर करून जुन्या इमारती पाडून त्याठिकाणी नव्या इमारती बांधल्यास कर्मचाऱ्यांची सोय होणार आहे. हेस्कॉम कर्मचाऱ्यांचे काम चोवीस तास असल्यामुळे कार्यालयाशेजारी क्वॉर्टर्स असणे गरजेचे आहे. त्यामुळे केपीटीसीएल आणि हेस्कॉम व्यवस्थापकांनी याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे.









