मार्कंडेय नदीकाठ परिसरात पाणीच पाणी : काही भागातील पिके पाण्याखाली
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील आठ दिवसांपासून पावसाने जोरदार सुऊवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सारेचजण समाधानी झाले आहेत. आता पावसाने जोर पकडला असून पाण्याचा ठणठणात असलेल्या मार्कंडेय नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी प्रवाहीत झाले आहे. त्यामुळे कंग्राळी खुर्द येथील जुना पूल यावर्षी पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरातील शेतीमध्ये काही प्रमाणात पाणी शिरले आहे.
या पावसामुळे नदीकाठावरील काही पिके पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदीकाठावरील परिसरात भात लागवड करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यावर्षी वळिवाने काही प्रमाणात हजेरी लावून अनेकांना संकटात टाकले होते. शेतीची मशागतीची कामे अर्धवट पडली होती.
जुलै मध्यावधीपर्यंत पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे अनेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. कधी एकदा पाऊस येतो, याकडेच साऱ्यांच्या नजरा लागून होत्या. मागील आठ दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आता नदी-नाले प्रवाहीत झाले असून शेतकरी सुखावला आहे. पावसामुळे शेतीकामांना वेग आला आहे. शुक्रवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे मार्कंडेय नदीच्या प्रवाहामध्ये वाढ झाली असून जुना पूल पाण्याखाली गेला आहे.









