वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रीक दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओला इलेक्ट्रीकचा समभाग सोमवारी मोठ्या प्रमाणात कोसळलेला दिसून आला. ओला इलेक्ट्रीक मोबिलिटीचा समभाग सोमवारी 6.25 टक्के घसरत 47 रुपयांवर घसरला होता. यायोगे कंपनीचे बाजार भांडवल मूल्य घसरत 20,845 कोटी रुपयांवर आले होते. ओला इलेक्ट्रीकने खुलासा केलाय की, ओला इलेक्ट्रीक टेक्नॉलॉजीज विरुद्ध दिवाळखोरीची याचिका दाखल करण्यात आली असून रोस्मर्टा डिजिटल सर्व्हिसेस यांनी ती दाखल केली आहे. ओला इलेक्ट्रीक टेक्नॉलॉजीज ही ओलाची पूर्ण स्वामीत्वाची सहकारी कंपनी आहे.
रोस्मर्टा डिजिटलने ही याचिका नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, बेंगळूर पीठाअंतर्गत दाखल केली आहे. ओलाने त्यांच्या सेवेसंदर्भातील रक्कम किंवा पेमेंट केलेले नाही, असा आरोप रोस्मर्टाने केला. याबाबत ओलाने सर्व आरोप फेटाळून लावले असून कायदेशीर सल्लामसलतीद्वारे या याचिकेला आव्हान देणार असल्याचे म्हटले.









