वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रामध्ये नावाजलेली कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपली परवडणारी नवी इलेक्ट्रिक दुचाकी ओला एस 1 एअर भारतीय बाजारामध्ये लाँच केली आहे. सदरच्या दुचाकीची किंमत 84 हजार 999 रुपये इतकी असणार आहे.
ओला कंपनीने एस 1 आणि ओला एस 1 प्रो याआधीच बाजारात लाँच केल्या आहेत, ज्यांच्या किंमती 1 लाखाच्या वर आहेत. जसे की कंपनीने यापूर्वी परवडणारी इलेक्ट्रिक दुचाकी सादर करणार असे म्हटले होते, त्याप्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने अखेर कंपनीने आपली नवी दुचाकी सादर केलीच. कंपनीने ही परवडणाऱया किमतीतील दुचाकी भारतीयांसाठी सादर केली आहे. ओला एस 1 प्रमाणेच वैशिष्टय़े सदरच्या नव्या दुचाकीमध्ये असणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कधी होणार पुरवठा
999 रुपये भरून सदरची गाडी ग्राहकांना राखून ठेवता येणार आहे. सदरची दुचाकी पुढील वर्षी फेब्रुवारीपासून खरेदी करता येणार असून या दुचाकींचा पुरवठा एप्रिल 2023 मध्ये सुरू होणार आहे. 4.5 किलोवॅट हब मोटरसह येणारी ही दुचाकी 90 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेऊ शकणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटर पर्यंतचे मायलेज गाडी देणार आहे. गाडी चार्ज होण्याकरिता 4 तास 30 मिनिटांचा कालावधी लागेल. ही गाडी डय़ुअल टोन कलरमध्ये येणार असून यात काळा, पांढरा, लाल, निळा आणि ग्रे या रंगांचा समावेश असेल.









