किंमत 80 हजाराच्या आसपास शक्य ः एस 1 गटातील येणार गाडी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवरात्राच्या काळामध्ये दुचाकी विक्रीमध्ये चारपट वाढ नोंदवणाऱया ओला इलेक्ट्रिकने दिवाळीच्या कालावधीपर्यंत आपली परवडणारी स्कूटर दाखल करण्याबाबतची घोषणा नुकतीच केली आहे.
एस 1 या सिरीज अंतर्गतची दुचाकी येणाऱया काळामध्ये परवडणाऱया किमतीमध्ये सादर केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या गाडीची किंमत 80 हजार रुपयांच्या आसपास असेल, असे सांगितले जात आहे. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्वीटरवर नव्या परवडणाऱया स्कूटरबाबत ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी या महिन्यामध्ये नवे काही तरी हाती देण्याची योजना असल्याचे सुतोवाच केले आहे.
200 केंद्रे सुरू करणार
दिवाळीचा उत्सवी हंगाम साध्य करण्यासाठी ओला इलेक्ट्रिकने योजना बनवून परवडणारी दुचाकी सादर करण्याचा विचार केला आहे. गेल्या काही महिन्यामध्ये ओलाने विस्ताराच्या दृष्टीनेही प्रयत्न केले आहेत. या अंतर्गत एक केंद्र चेन्नईमध्ये सुरू केले असून अशी 200 केंद्रे आता आगामी काळात टप्प्याटप्प्याने देशभरामध्ये सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.










