वृत्तसंस्था/ बेंगळूर
दुचाकी इलेक्ट्रीक वाहन निर्माती कंपनी ओला इलेक्ट्रीक येणाऱया काळामध्ये व्यावसायिक वाहने बाजारात आणण्याचा विचार करते आहे. सदरच्या वाहनांच्या निर्मितीची योजना कंपनीने आखली असल्याची माहिती कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली आहे.
आगामी काळामध्ये नुसतीच व्यावसायिक वाहने नाही तर कार्सही दाखल केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तांत्रिक आधुनिक सहकार्यासह पुढील काही महिन्यांमध्ये नव्या उत्पादनाच्या निर्मितीबाबत प्रयोग केला जाणार आहे. कार, दुचाकी यांच्यासह व्यावसायिक वाहनांच्या निर्मितीबाबत आपल्या कंपनीतील सहकारी व कर्मचारी काम करत आहेत. यासाठी सॉफ्टवेअर, सेल व इतर इलेक्ट्रॉनिक यंत्रणा उत्पादनासाठी कशा पद्धतीने वापरली जायला हवी, याबाबतचा आढावा घेणार असल्याचे सीईओ अग्रवाल यांनी सांगितले. तंत्रज्ञान हे आमच्यासाठी महत्त्वाचे असणार असून पुढील काही महिन्याच्या अवधीत त्याचाच वापर करत आम्ही आमची नवी उत्पादने बाजारामध्ये दाखल करणार आहोत. त्याकरिताचे नियोजन करण्यात आले आहे.
असा करणार खर्च
कंपनी आगामी काळामध्ये दुचाकी व्यवसायातून बऱयापैकी नफा प्राप्त करू शकणार आहे आणि यातूनच कंपनी येणाऱया काळामध्ये नव्या उत्पादनाच्या निर्मितीकरिता लागणारा आवश्यक निधी खर्च करण्याचे नियोजन करणार आहे. जाहिरातीसंदर्भात आपण जास्त खर्च करत नसल्याचेही स्पष्टीकरण सीईओ भाविश अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.









