वृत्तसंस्था/ मुंबई
ओला या इलेक्ट्रिक कंपनीने डिसेंबर तिमाहीचा निकाल घोषित केला असून तो कंपनीसाठी नकारात्मक ठरलेला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या कालावधीत कंपनीने 564 कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीने 376 कोटीचा तोटा सहन केला होता.
याखेपेचा तोटा पाहिल्यास तोट्यामध्ये जवळपास 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. बेंगळूरमध्ये मुख्यालय असणाऱ्या या कंपनीच्या तिमाहीतील महसुलात देखील 19 टक्के घसरण दिसून आली. डिसेंबर अखेरच्या तिमाहीत 1045 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी पाहता कंपनीने 1296 कोटी रुपये प्राप्त केले होते. अनेक आव्हाने, स्पर्धात्मक वातावरण या साऱ्याला तोंड द्यावे लागल्यामुळे कंपनीला नकारात्मक कामगिरी करावी लागली आहे.
हिस्सेदारी आणि खर्च
कंपनीची बाजारातील हिस्सेदारीदेखील अलिकडच्या काही महिन्यांमध्ये कमी झालेली पहायला मिळाली आहे. सदरच्या तिमाहीत कंपनीचा खर्च 1506 कोटी रुपयांवर राहिला आहे. जो मागच्या वर्षी 1597 कोटी रुपये होता. म्हणजेच खर्चामध्ये कपात करण्यामध्ये कंपनीला यश आले आहे.









