एप्रिल-मेमधील कामगिरी ः उत्पादन वाढवणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इलेक्ट्रिक दुचाकी निर्माती कंपनी ओला इलेक्ट्रिक यांनी पहिल्या दोन महिन्यात 500 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करण्यात यश मिळवलं आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात कंपनीने ही कामगिरी केली आहे.
सध्याला ओलाच्या वाहन विक्रीत काहीशी घट झाली आहे. तरीही या वर्षाअखेर 7 हजार 800 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ग्राहकांचा ओलावर वाढता विश्वास असून येत्या काळातही तो वाढेल व दुचाकी विक्रीला चांगला प्रतिसाद लाभेल अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. ओलाने आपल्या दुचाकी निर्मितीवर अधिकाधिक लक्ष देण्याचे ठरवले आहे. कृष्णगिरी येथील कारखान्यात कंपनी सध्याला दिवसाला 1 हजार दुचाकी तयार करण्याची योजना करत आहे. या दरम्यान ओलाच्या एस वन प्रोच्या नोंदणीत घट झाल्याचे दिसून आले आहे.
किती झाली विक्री
मेमध्ये 9 हजार 196 एस वन प्रोची खरेदी झाली आहे. तर एप्रिलमध्ये 12 हजार 683 एस वन प्रोची विक्री झाली होती. ओलाने याचदरम्यान जवळपास 50 हजार ग्राहकांना देशातील विविध भागात इलेक्ट्रिक दुचाकींचा पुरवठा केला आहे. ऑगस्टमध्ये मागच्या वर्षी लाँच केलेल्या ओलाला पुढे सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे पुरवठय़ात अडथळे जाणवले.
आले विविध अडथळे
गाडी बुक करण्याच्या योजनेला मागच्या वर्षी जुलैमध्ये कंपनीने सुरूवात केली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑनलाइन इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीला सुरूवात झाली होती. ऑक्टोबरमध्ये पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते पण त्या महिन्यात पुरवठा होऊ शकला नाही. डिसेंबरपर्यंत याबाबतीत चालढकल सुरू होती. यावर्षी जानेवारीपासून प्रत्यक्षात पुरवठय़ाला सुरूवात झाली. मध्यंतरी स्कुटरला आग लागल्याचे निमित्त झाले आणि पुन्हा या गाडीच्या विक्रीवर निर्बंध आले. सरकारने एकदा याबाबतीतली भूमिका मांडली की नंतर दुचाकी विक्री करण्याच्या प्रक्रियेला कंपनीला वेग देता येणे शक्य होणार आहे.









