कोल्हापूर / संतोष पाटील :
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला पालकमंत्र्यांसह अधिकारी बंद गळ्याच्या कोटमध्ये बघण्याची सवय लागली आहे. मात्र, पालकमंत्री प्रकाश आबिटकर याला अपवाद ठरले आहेत. मंत्री झाल्यापासून मागे–पुढे सरकारी गाड्यांचा ताफा त्यांनी टाळला आहे. झेंडावंदनासाठी ते नेहमीच्या जीन पॅंट आणि बाह्या दुमडलेला पांढरा शर्ट या फॉर्मल ड्रेसमध्येच दिसले. अरेव्वा…! असाही पालकमंत्री असू शकतो, अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटली. मंत्री प्रकाश आबिटकर यांचा साधेपणा आणि स्वभावातील मृदूपणाचे राज्याला अप्रुप वाटत आहे. आरोग्य विभागाला सदृढ करण्यासह जिह्यातील विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यातही त्याचा सहभाग नजरेत भरेल, याची शाश्वती त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीवरुन दिसत आहे.
पालकमंत्री म्हणजे जिह्याचा मुख्यमंत्रीच मानला जातो. मग आपूसकच तालेवारपणा आणि नजरेतील करारीपणा येतोच येतो. गेल्या दहा वर्षात चंद्रकांत पाटील, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ वगळता कोल्हापूरला कायमच परजिह्यातील पालकमंत्री लाभला. जिह्याबाहेरील पालकमंत्री म्हणजे कोल्हापूरला पर्यटनासाठी भेट देणारे मंत्री अशीच अवस्था होती.
जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या आदल्या रात्री परजिह्यातील पालकमंत्र्यांचा कोल्हापुरात मुक्काम असायचा. बैठकांचा धुरळा उडायचा, माध्यमातील रकानेच्या भरतील इतके कोल्हापूरचा विकास आणि समस्यांवरील उपाययोजनांवर बोलायचे. पुढच्या बैठकीपर्यंत पुढील पाठ मागील सपाट, अशी अवस्था या घोषणांची आणि बैठकांची होती. या जिह्याबाहेरील पाहुण्या पालकमंत्र्यांसाठी खास चाय–पाणीपासून जेवणखाण्यासह सोबतच्या गोतावळ्याची मर्जीही प्रोटोकॉलसाठी नेमलेल्यांना करावी लागत होती. साहेब! ग्रीन टी घेत असतील तर तो अमूक एका कंपनीचा पाहिजे, सोबत मॅडम येणार असतील तर त्यांच्या अंबाबाई दर्शनापासून सर्व सोयीसुविधा अचूक ठेवावी लागत होती. साहेबांच्या बदधास्तीत यंत्रणा मेटाकुटीला येत होती. हे चित्र चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री झाल्यानंतर बदलले. प्रोटोकॉलची प्रथा तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या कारकिर्दीतही मागे पडली. मात्र, अजूनही एखादा परजिह्यातील मंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर आला की त्यांच्या प्रोटोकॉलची प्रशासनात चवीने चर्चा होते.
पालकमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री म्हणजे असा असतोच, ही दृश्यमान प्रतिमा बदलण्यात मंत्री प्रकाश आबिटकर यांना कमालीचे यश आले आहे. कॅबिनेट मंत्री असूनही प्रकाश आबिटकर सायरन वाजवणाऱ्या सरकारी गाड्यांचा मागे–पुढे लवाजमा (कॅन्व्हाय) घेत नाहीत. इनोव्हा या सरकारी गाडीतून पुढच्या सिटवर बसूनच ते जिह्यात आणि जिह्याबाहेर फिरत असतात. या एकाच गाडीत त्यांचे स्वीय सहाय्यक आणि गरज असेल तर अधिकारी आणि जवळचे कार्यकर्ते असतात. मंत्र्याची गाडी म्हणजे वाजणारा सायरन आणि घाईने रस्त्यातील वाहनांना बाजूला सारत जाणारा गाड्याचा ताफा हेच नागरिकांनी आतापर्यंत बघितले आहे. मात्र मंत्री प्रकाश आबिटकर यांचे एकटेच वाहन कधी गर्दीत तर कधी सिग्नलला उभे असलेले दिसते. पाहणाऱ्याला काही सेकंदाने आठवते, अरे हे तर मंत्री आबिटकर आहेत. समोरचा हात करुन अभिवादन करताच, आबिटकरही तितक्याच आदबीने त्याला प्रतिउत्तर देत असल्याचे चित्र जिह्याला आता परिचित झाले आहे.
मंत्री आबिटकर यांचा जिन पॅन्ट आणि हाताच्या बाह्या दुमडलेल्या पांढरा शर्ट हा पोशाख ते जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून कोल्हापूरकरांना परिचित आहे. ते आमदार झाल्यानंतर त्यात बदल झाला नाही. मंत्री झाल्यानंतरही पोशाखासह साधेपणा त्यांच्यात कायम आहे. रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शाहू मैदानावर ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसह अधिकारी बंद कोटाच्या गळ्dयात उपस्थित राहतात. आबिटकर मात्र पांढरा शर्ट आणि जिन पँट या नेहमीच्या पोशखात आले. त्यांचा हा साधेपणा राज्याने पाहिला आणि त्याचे अप्रुपही वाटले. आबिटकर यांच्या वागण्यातील साधेपणा तितक्याच तळमळीने जिह्यातील प्रत्येक तालुक्यातील विकासाचा बॅकलॉग भरुन काढणारा ठरावा. आरोग्य विभागच व्हेंटीलेटरवर आहे, त्यांच्या कारकिर्दीत सर्वसामान्यांना वेळेत आणि योग्य मोफत उपचार व्हावा, इतकीच अपेक्षा आहे.
- असाही अनुभव
मुंबईत जे.जे. रुग्णालयाच्या आवारात आरोग्य भवन आहे. तेथे 8 जानेवारीला आरोग्य भवनला प्रथमच मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली. सायंकाळच्या सत्रात मंत्री महोदय येणार असल्याने भवन अलर्ट मोडवर होते. सह्याद्री विश्रामगृहावरील बैठक आटोपून प्रकाश आबिटकर सायंकाळी आले. आठव्या मजल्यावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आणि तासाभराने निघूनही गेले. आतापर्यंत मंत्र्यांचा पाहिलेला लवाजमा किंवा तामझाम नसल्याने आबिटकर यांची पहिली बैठक आणि आरोग्य भवनातील ही भेट उपस्थितांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली.








